

सोल : उत्तर कोरियाने मंगळवारी समुद्राच्या दिशेने एका अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासह इतर घातक शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली आहे. रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी पाश्चात्य देशांकडून उत्तर कोरियावर आणल्या जाणाऱ्या दबावाला उघडपणे विरोध दर्शवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उत्तर कोरियाने हे नवे शक्तिप्रदर्शन केले आहे.
दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील 'जोंगजू' शहरातून डागण्यात आले. या क्षेपणास्त्राने हवेत सुमारे ८० किलोमीटर (५० मैल) अंतर कापले. या क्षेपणास्त्रासोबतच उत्तर कोरियाने इतरही काही प्रक्षेपक डागले आहेत, मात्र त्यांच्या स्वरूपाबाबत लष्कराने सविस्तर माहिती दिलेली नाही.
दक्षिण कोरियाच्या प्रसारमाध्यमांनी लष्करी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या चाचणीत 'मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम'चा समावेश असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची हवाई संरक्षण यंत्रणा भेदण्याची स्वतःची क्षमता तपासण्यासाठी उत्तर कोरियाने एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा मारा केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पहिलीच मोठी चाचणी
उत्तर कोरियाने १९ एप्रिलनंतर केलेली ही पहिलीच मोठी शस्त्रास्त्र चाचणी आहे. १९ एप्रिल रोजी केलेल्या चाचणीत क्लस्टर बॉम्ब वॉरहेड्स वाहून नेणाऱ्या शॉर्ट-रेंज क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. २०१९ मध्ये ट्रम्प यांच्यासोबतची अणु-मुत्सद्देगिरी अपयशी ठरल्यापासून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र साठ्याचे आधुनिकीकरण करण्यावर पूर्ण भर दिला आहे. गेल्या काही वर्षांत किम यांनी रशियासोबतचे संबंध कमालीचे दृढ केले असून, युक्रेन युद्धासाठी रशियाला लष्कर आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांचा पुरवठाही केला आहे. दुसरीकडे, उत्तर कोरियाची आर्थिक लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या चीनसोबतही त्यांनी सहकार्य वाढवले आहे.
गेल्या आठवड्यात बीजिंग येथे झालेल्या शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाला पाठिंबा दिला होता. उत्तर कोरियाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या 'आर्थिक निर्बंध, राजकीय एकाकीपण आणि लष्करी दबावाला' आपला विरोध असल्याचे क्रेमलिनने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते. युएन सुरक्षा परिषदेत नकाराधिकार असलेल्या रशिया आणि चीनने नेहमीच अमेरिकेच्या उत्तर कोरियावरील निर्बंध कडक करण्याच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे.
'दक्षिण कोरिया आमचा सर्वात मोठा शत्रू'
किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, त्याला आपला 'सर्वात मोठा शत्रू' घोषित केले आहे आणि सर्व संबंध तोडून टाकले आहेत. गेल्या आठवड्यात लष्करी कमांडरच्या बैठकीत किम यांनी दक्षिण कोरियाच्या सीमेला 'अभेद्य किल्ला' बनवण्याच्या उद्देशाने सीमेवरील लष्करी तुकड्या आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली होती.
दक्षिण कोरियाचे चोख प्रत्युत्तर
या घडामोडींवर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष 'ली जे म्युन' यांनी एका कॅबिनेट बैठकीत देशाच्या लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ करण्याचे आवाहन केले. उत्तर कोरियाचा थेट उल्लेख न करता ते म्हणाले की, दक्षिण कोरियाने 'स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेण्याचा आणि रक्षण करण्याचा संकल्प' दाखवणे गरजेचे आहे, ज्यामुळे अमेरिकेसोबतची युती अधिक मजबूत होईल. याशिवाय त्यांनी दक्षिण कोरियाच्या सैन्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन क्षमता आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या समाविष्ट करण्यावर विशेष भर दिला.