
सेऊल : रशिया आणि युक्रेन युद्धात उत्तर कोरिया रशियाला बिनशर्त पाठिंबा देईल, अशी ग्वाही उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांनी उत्तर कोरिया भेटीवर आलेल्या रशियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दिली असल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात उत्तर कोरियाचे सैन्य रशियामध्ये प्रथमच तैनात करण्यास दोन्ही देशांनी मान्यता दिली होती. रशियाच्या कुर्स्क सीमेवर युक्रेनने घुसखोरी केली आहे. त्याचा रशिया आणि उत्तर कोरिया एकत्रितपणे मुकाबला करील. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी उत्तर कोरियाचे आभार मानले आहेत. हा त्याग आम्ही विसरणार नाही, असे पुतिन म्हणाले.
युक्रेनच्या प्रश्नासह उत्तर कोरिया रशियाला आणि त्यांच्या परराष्ट्र धारणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा देईल, असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव सर्जेई शोईगू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीच्या वेळी उत्तर कोरियाने स्पष्ट केले होते, असे वृत्त कोरियाच्या अधिकृत मध्यवर्ती वृत्तसंस्थेने दिले आहे.