तेलाच्या किमती १५० डॉलरवर जातील; कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांचा इशारा

प. आशियातील संघर्ष अधिक गंभीर झाल्यास आणि आखाती देशांतून तेल पुरवठ्यावर परिणाम झाल्यास तेलाचे दर १५० डॉलर प्रति पिंपावर जाऊ शकतात, असा इशारा कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांनी दिला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

दोहा : प. आशियातील संघर्ष अधिक गंभीर झाल्यास आणि आखाती देशांतून तेल पुरवठ्यावर परिणाम झाल्यास तेलाचे दर १५० डॉलर प्रति पिंपावर जाऊ शकतात, असा इशारा कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांनी दिला.

‘फायनान्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, तेलाचे दर वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट निर्माण होऊ शकेल. कारण बहुतांशी देश हे आखाती देशांच्या तेलावर अवलंबून आहेत. संघर्ष सुरूच राहिल्यास आखाती देशातील ऊर्जा उत्पादकांना ‘फोर्स मॅज्योर’ जाहीर करून पुरवठा थांबवावा लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

काबी म्हणाले, “ज्यांनी अजून ‘फोर्स मॅज्योर’ जाहीर केलेले नाही, तेही संघर्ष काही दिवस चालू राहिला तर तसे करावे लागेल. आखातातील सर्व निर्यातदारांना शेवटी ‘फोर्स मॅज्योर’ जाहीर करावे लागेल. जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना कायदेशीर जबाबदारीला सामोरे जावे लागेल.”

ते म्हणाले, हे युद्ध काही आठवडे सुरू राहिले तर जगभरातील विकास दर वाढीवर परिणाम होईल. ऊर्जा किमती सर्वत्र वाढतील, ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे अनेक उद्योगांवरही परिणाम होऊ शकतो, कारण आखातातील उत्पादक मोठ्या प्रमाणावर पेट्रोकेमिकल्स आणि खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करतात.

काही उत्पादनांचा तुटवडा निर्माण होईल आणि कारखान्यांच्या पुरवठा साखळीवर साखळीप्रमाणे परिणाम होईल, असे काबी म्हणाले.

कतारच्या ‘रास लाफान ‘एलएनजी’ प्रकल्पावर इराणी ड्रोनने गेल्या आठवड्यात हल्ला झाला. या प्रकल्पाचे नुकसान किती झाले आहे याचा आढावा अद्याप सुरू आहे. सध्या नुकसानीचा अचूक अंदाज आलेला नाही. दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल हेही स्पष्ट नाही,’ असे त्यांनी सांगितले.

युद्ध थांबले तरी कतारला एलएनजी निर्यात पूर्ववत करण्यासाठी ‘आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत’ कालावधी लागू शकतो. आमची जहाजे सर्वत्र विखुरलेली आहेत. कतारकडे ‘एलएनजी’ वाहतुकीसाठी १२८ जहाजे आहेत. त्यापैकी फक्त सहा ते सात जहाजेच माल चढवण्यासाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक अडथळ्यात राहिल्यास ऊर्जा बाजारात मोठे संकट निर्माण होऊ शकते. येत्या दोन ते तीन आठवड्यांत टँकर्सना या होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग मिळाला नाही, तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति पिंप १५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.

सुरक्षेच्या कारणामुळे उत्पादन थांबवले

कतार एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले काबी म्हणाले की, संभाव्य हल्ल्याच्या इशाऱ्यांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या लष्कराने ऑफशोअर सुविधांवर तातडीचा धोका असल्याची माहिती दिली होती.

वायूच्या किमती ४० डॉलरवर जातील

तेल व नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे कायम राहिल्यास नैसर्गिक वायूच्या किमती प्रति एमएमबीटीयू ४० डॉलरपर्यंत वाढू शकतात. जे युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या किमतींपेक्षा जवळपास चारपट आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in