Video : ३७००० फूट उंचीवर विमानाला जोरदार झटका, २२९ प्रवासी हवेत उडाले! नेमकं काय घडलं?

२१ मे २०२४ रोजी सिंगापूर एअरलाइन्सचे बोईंग ७७७-३००ER हे विमान लंडनहून सिंगापूरला जात होतं आणि अचानक...
Video : ३७००० फूट उंचीवर विमानाला जोरदार झटका, २२९ प्रवासी हवेत उडाले! नेमकं काय घडलं?

जर तुम्ही विमानानं प्रवास करत असाल तर तुम्हाला टर्ब्युलन्स (Turbulence) हा शब्द माहीत असेलच. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास विमानाला झटके बसणं किंवा ते इकडं तिकडं हलणं-डोलणं याला टर्ब्युलन्स म्हणतात.

उड्डाणाच्या वेळी विमान थोडं इकडे तिकडे डोलू लागतं. त्यामुळं प्रवासी काही वेळा घाबरतात. पण विमानात घडणारी ही घटना अगदी सामान्य आहे. अलीकडच्या काळातील अत्याधुनिक विमानांना कोणताही धोका नसतो. जेव्हा असं घडतं, तेव्हा ज्या लोकांनी सीटबेल्ट लावला नाही, असेच लोक जखमी होण्याची शक्यता असते.

मात्र कधी-कधी हा टर्ब्युलन्स इतका धोकादायक असतो की, प्रवाशांसाठी तो जीवघेणा ठरतो. याचं ताजं उदाहरण म्हणजे सिंगापूर एअरलाइन्समध्ये घडलेली घटना.

२१ मे २०२४ रोजी खराब हवामानामुळे सिंगापूर एअरलाइन्सचे बोईंग ७७७-३००ER विमान भयंकर डर्ब्युलन्समध्ये अडकलं. लंडनहून सिंगापूरला जाताना विमानाला जोरदार धक्का बसला, त्यामुळे विमान वेगाने इकडे तिकडे डोलू लागले.

हे धक्के इतके तीव्र होते की, विमान अवघ्या ५ मिनिटांत ६ हजार फूट खाली आलं. असंही सांगण्यात येतंय की, टर्ब्युलन्सच्या काही सेकंद आधी, विमान ३७ हजार फूट उंचीवर उड्डाण करत होते, जे टर्ब्यलन्सनंतर ३१ हजार फुटांपर्यंत खाली आलं.

या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. टर्ब्युलन्सनंतर विमानाचं बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात २११ प्रवासी आणि १८ क्रू मेंबर्स होते.

या भीषण झटक्यांमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी विमानातील भितीदायक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या चेहऱ्यावरील भीती आणि दहशत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

टर्ब्युलन्स म्हणजे काय: टर्ब्युलन्स म्हणजे हवेत अचानक होणारा बदल, ज्यामुळे विमान हलू लागतं. हवेतील विविध तापमान आणि दाब असलेल्या भागांची टक्कर झाल्यामुळं अशी परिस्थिती उद्भवते.

टर्ब्युलन्स किती धोकादायक : सामान्यतः, टर्ब्युलन्स हा हवाई प्रवासासाठी धोका नसतो. आधुनिक विमानांची रचना टर्ब्युलन्स सहन करू शकते. तथापि, तीव्र टर्ब्युलन्समध्ये विमानाला हादरे बसू शकतात आणि ते पडूही शकते. अशा स्थितीत दुखापती होण्याचा धोका असतो.

टर्ब्युलन्सपासून बचावाचे उपाय: विमानात नेहमी सीट बेल्ट बांधा. प्रवासादरम्यान सामान ओव्हरहेड रॅकमध्ये ठेवा. विमानात दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि घाबरू नका. टर्ब्युलन्स हा हवाई प्रवासाचा सामान्य भाग आहे. थोडी सावधगिरी बाळगल्यास तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.

जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर तुम्हाला असे दिसून येईल की तीव्र टर्ब्युलन्स फारच दुर्मिळ आहे, ५०००० फ्लाइटपैकी फक्त एकावर परिणाम होतो. तथापि, ग्लोबल वार्मिंगमुळे त्याचं प्रमाण वाढू शकतं.

logo
marathi.freepressjournal.in