सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू

सिंगापूर एअरलाईन्सचे विमान मंगळवारी म्यानमारच्या आकाशातून जात असताना ‘एअर टर्ब्युलन्स’मध्ये सापडले. विमानाला हवेच्या धडकेचा फटका बसल्याने एका ब्रिटिश प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले.
सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात एअर टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू
X

सिंगापूर : सिंगापूर एअरलाईन्सचे विमान मंगळवारी म्यानमारच्या आकाशातून जात असताना ‘एअर टर्ब्युलन्स’मध्ये सापडले. विमानाला हवेच्या धडकेचा फटका बसल्याने एका ब्रिटिश प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले.

सिंगापूर एअरलाईन्सचे विमान लंडनहून सिंगापूरला जात होते. भारतीय वेळेनुसार रात्री २.४५ वाजता या विमानाने लंडनहून उड्डाण केले. टेकऑफनंतर ११ तासांनंतर हे विमान म्यानमारच्या हवाई हद्दीत असताना ३७ हजार फूट उंचीवर खराब हवामानाच्या तडाख्यात सापडले. या विमानाला अनेक झटके बसले. हे विमान ५ मिनिटांत ३७ वरून ३१ हजार फूट उंचीवर आले.

विमान खाली येत असताना प्रवाशांना सीटबेल्ट घालण्याची सूचना दिली नव्हती. त्यामुळे अनेक प्रवासी जागेवरच उडाले. अनेकांचे डोके सामान ठेवण्याच्या जागेला आपटले. त्यात ३० जण जखमी झाले.

त्यानंतर तातडीने भारतीय वेळेनुसार, दुपारी २.१५ वाजता विमान बँकॉकला वळवण्यात आले. बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग करण्यात आले. या विमानात २११ प्रवासी व १८ कर्मचारी होते. विमान विमानतळावर उतरल्यावर तत्काळ अनेक रुग्णवाहिका पोहचल्या व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एअर टर्ब्युलन्स म्हणजे काय?

विमानाला उड्डाण करताना हवेची मोठी मदत होत असते. या उड्डाणात हवेने अडथळा निर्माण केल्यास ‘एअर टर्ब्युलन्स’ म्हटले जाते. यात विमान हलू लागते व त्याचे उड्डाण अनियमित होते. म्हणजेच विमान आपला मार्ग भरकटते. कधी कधी अचानक विमान शेकडो फूट खाली येते. विमान जेव्हा एअर टर्ब्युलन्समध्ये सापडते. तेव्हा प्रवाशांना वाटते की, विमान पडणार आहे. खडबडीत रस्त्यावरून कार ज्याप्रमाणे चालते त्याचप्रमाणे एअर टर्ब्युलन्समध्ये विमानाची अवस्था होते.

logo
marathi.freepressjournal.in