
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. पण, भारतीय सैन्याने २१ दहशतवादी अड्ड्यांची माहिती मिळवली होती, हा खुलासा उपसेनाप्रमुख लेफ्ट. जन. राहुल आर सिंह यांनी शुक्रवारी केला. तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणेच्या आधारे डेटा गोळा करण्यात आला होता, ज्यामध्ये २१ दहशतवादी अड्ड्यांबद्दल माहिती मिळाली होती, परंतु शेवटच्या क्षणी फक्त ९ अड्ड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.
लेफ्ट. जन. राहुल आर सिंह यांनी फिक्कीच्या 'न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज ऑर्गनायझ्ड' कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्वाची माहिती दिली. ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्या अड्ड्यांमध्ये दहशतवाद्यांची भरती आणि त्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
२१ दहशतवादी अड्ड्यांवर कारवाईची योजना आखलेली
राहुल आर सिंह पुढे म्हणाले, खरेतर २१ दहशतवादी अड्ड्यांची माहिती मिळाली होती, परंतु शेवटच्या क्षणी नऊ अड्ड्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्ध सुरू करणे सोपे आहे, परंतु ते नियंत्रित करणे खूप कठीण आहे, म्हणूनच योग्य वेळी संघर्ष थांबवणे हा योग्य निर्णय होता. ऑपरेशन सिंदूरमधून काही धडे शिकलो आहोत. नेतृत्वाने दिलेला धोरणात्मक संदेश स्पष्ट होता...आता सहन करायचे नाही.
चीनकडून पाकिस्तानचा चाचणी प्रयोगशाळेप्रमाणे वापर
यावेळी सिंह यांनी चीनवर मोठे भाष्य केले आहे. पाकिस्तान भारताविरोधात लढत होता, पण चीन हा त्याला सर्व मदत करत होता. चीनने सॅटेलाईट वळविले होते, यात आश्चर्यकारक असे काही नव्हते. कारण गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने जी जी शस्त्रे वापरली, त्यापैकी ८१ टक्के शस्त्रे चीनची होती. चीन आपल्या शस्त्रांची चाचणी इतर शस्त्रांबरोबर वापरुन घेत आहे. चीन आपल्या या शस्त्रांची चाचणी एखाद्या जिवंत प्रयोगशाळेसारखी करत आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताविरोधात तुर्कीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तुर्की सतत पाकिस्तानसोबत होता. युद्ध एका सीमेवर होत होते पण विरोधक तीन होते, असे सिंह म्हणाले.