
टोकियो : भारतीयांचे कार स्वप्न पूर्ण करणारे सुझुकी मोटर्सचे अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे २५ डिसेंबरला निधन झाले. कंपनीने शुक्रवारी त्यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले. भारतात ‘मारुती ८००’ ही कार अवघ्या ४७,५०० रुपयांत देत त्यांनी भारतीयांचे कारचे स्वप्न पूर्ण केले.
भारतातील अन्य वाहन कंपन्या लक्झरी ब्रँडच्या कार बनवण्याच्या मागे लागलेल्या असतानाच ओसामू सुझुकी यांनी भारतातील मध्यमवर्गीयांना समोर ठेवून ‘मारुती-८००’ बाजारात आणली. भारतीयांची गरज लक्षात घेण्यासाठी त्यांनी भारतातील गावागावांत व शहराशहरांत जाऊन प्रवास केला. भारताला टिकाऊ व स्वस्त कारची गरज आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यातून त्यांनी ‘मारुती-८००’ बाजारात आणली. या कारने भारतात इतिहास घडवला.
‘सुझुकी मोटर कॉर्पोरेशन’चे २१ वर्षं ते अध्यक्ष होते. आता कंपनीची सूत्रे त्यांचे पुत्र तोशिरो सुझुकी यांच्याकडे आहेत.
‘मारुती-सुझुकी’ने भारतात विकल्या ३ कोटी कार
भारतात १९८२ मध्ये भारत सरकार व सुझुकीत संयुक्त कराराद्वारे ‘मारुती’ कंपनीची स्थापना झाली. यातून मारुती उद्योगाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यांनी ‘मारुती-८००’ ही कार भारतीय बाजारपेठेत उतरवल्यानंतर सुझुकी कंपनीला भारतात मागे वळून पाहावे लागले नाही. त्या काळी ‘मारुती-८००’ची एक्स शोरूम किंमत ४७,५०० रुपये होती. यामुळे सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न पूर्ण झाले. गेल्या ४० वर्षांत भारतात ३ कोटी कार ‘मारुती-सुझुकी’ने विकल्या आहेत.