

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षानंतर तत्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली असून दीर्घकालीन शांतता सुनिश्चित करण्यासाठी ‘यंत्रणा’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्षांमध्ये दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक, नागरिक आणि दहशतवादी ठार झाले आहेत.
कतार आणि तुर्कियेच्या मध्यस्थीने दोहा येथे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि अफगाणिस्तानचे कार्यवाह संरक्षण मंत्री मुल्ला याकूब यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला, असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी तत्काळ युद्धविराम आणि शांतता व स्थैर्य मजबूत करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यास सहमती दर्शवली,” असे निवेदनात नमूद करण्यात आले.
दोन्ही शेजारी देशांनी युद्धविरामाची ‘अंमलबजावणी’ आणि ‘सातत्य’ सुनिश्चित करण्यासाठी येत्या काही दिवसांत ‘पुढील बैठक’ घेण्याचेही मान्य केले आहे, जेणेकरून दोन्ही देशांमध्ये स्थैर्य आणि सुरक्षा प्रस्थापित करता येईल.
हा युद्धविराम पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात काबुलजवळ झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर सीमेपलीकडील चकमकी तीव्र झाल्या होत्या.
दोहा येथील चर्चा शनिवारी सुरू झाली, जिथे पाकिस्तानने अफगाण तालिबान प्रशासनाला ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) विरोधात कारवाईचे आवाहन केले. पाकिस्तानचा आरोप आहे की ‘टीटीपी’ दहशतवादी हल्ले अफगाण भूमीवरून करत आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अफगाण अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाशी केलेल्या ‘वचनबद्धतेचा’ सन्मान ठेवावा आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध ठोस, सत्यापन करता येईल अशी कारवाई करावी.
“पाकिस्तानने कतारच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या चर्चांमुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल अशी आशा वाटते,” असे निवेदनात म्हटले आहे.