इस्लामाबाद : इराणने पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने बुधवारी रात्री इराणच्या बलूच लिबरेशन आर्मीच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ४ मुले, ३ महिलांसहित ९ जणांचा मृत्यू झाला आहे, असे इराणने जाहीर केले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्ता मुमताज बलोच यांनी सांगितले की, देशाच्या संरक्षणासाठी ही कारवाई केली. ही मोहीम यशस्वी होणे ही पाकिस्तानी लष्कराच्या सक्षमतेचा पुरावा आहे. पाकिस्तानने दावा केला की, इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान भागात अनेक दहशतवाद्यांना ठार केले. यात एकही इराणचा नागरिक नव्हता. या हल्ल्यानंतर इराणने पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्याला बोलावले, तर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान जागतिक आर्थिक परिषद अर्ध्यावर टाकून परत आले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दोल्लाहियन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. हा हल्ला इराणच्या दहशतवादी संघटनेवर केला. यात पाकिस्तानचा कोणताही नागरिक जखमी झालेला नाही. जिलानी यांनी सांगितले की, कोणत्याही देशाला अडचणीच्या मार्गाने चालता कामा नये. इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तराचा पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने २४ तासांत इराणवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानने इराणमध्ये केलेल्या मोहिमेला ‘मार्ग बार सरमाचर’ असे नाव दिले. पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले की, पाकिस्तानी हवाई दलाने बलूच फुटीरतावाद्यांच्या सात ठिकाणांवर हल्ले केले. हा हवाई हल्ला इराणच्या सीमेच्या आत ४८ किमीवर करण्यात आला. यासाठी लढाऊ विमाने व ड्रोन्सचा हल्ला केला. पाकिस्तानात इराणने केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले की, कोणताही देश आपल्या संरक्षणासाठी कारवाई करत असेल तर भारत त्यांची परिस्थिती समजू शकतो. हे प्रकरण पाकिस्तान व इराणच्या दरम्यानच आहे. दहशतवादाबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या हल्ल्याचा विरोध केला. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलरने सांगितले की, इराणने नुकतेच आपल्या तीन शेजारी देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे.