
इस्लामाबाद : भारताविरोधात संघर्षात मार खाऊनही पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना बढती देऊन फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी हा निर्णय घेतला.
भारताच्याविरोधातील ‘बुनयान-उम-मार्सूस’ या मोहिमेचे नेतृत्व केल्याप्रकरणी मुनीर यांना बढती देण्यात आली. मुनीर यांच्यापूर्वी १९५९ मध्ये हुकूमशहा अयुब खान यांनी स्वत:ला फील्ड मार्शल घोषित केले होते.
फील्ड मार्शल हे पाकिस्तानी सैन्यातील सर्वोच्च रँक आहे. ती पंचतारांकित रँक समजली जाते. ही रँक चार तारांकितापेक्षा अधिक आहे. पाकिस्तानात फील्ड मार्शलचे पद लष्कर, नौदल व हवाई दलापेक्षा वरिष्ठ असते. पाकिस्तानात ही रँक केवळ खास परिस्थितीत दिली जाते.
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख राहील शरीफ यांना फील्ड मार्शलचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. जनरल शरीफ यांनी चांगले काम केल्याने त्यांना हे पद दिले जावे यासाठी इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार, फील्ड मार्शलकडे कोणतेही अतिरिक्त संवैधानिक अधिकार नसतात. फील्ड मार्शल यांच्या नियुक्तीसाठी पंतप्रधान, राष्ट्रपती व संरक्षण मंत्र्यांची सहमती लागते.