
फ्लोरिडा : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला थेट अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताकडून आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तर आम्ही अर्धे जग नष्ट करू, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. भारत म्हणजे महामार्गावरून वेगाने येणारी चकचकीत मर्सिडीज आहे, पण आम्ही खडीने भरलेला एक डंप ट्रक आहोत, जर ट्रकची कारला धडक बसली, तर नुकसान कोणाचे होईल हे स्पष्ट आहे, अशी दर्पोक्तीही मुनीर यांनी केली.
एका खासगी कार्यक्रमात बोलताना मुनीर यांनी ही गरळ ओकली. फ्लोरिडातील टँपा येथे उद्योगपती आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीत मुनीर म्हणाले, आम्ही एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत, जर आम्हाला वाटले की आमचे अस्तित्व धोक्यात आहे, तर आम्ही अर्ध्या जगाला आमच्यासोबत घेऊन बुडू. अमेरिकेच्या भूमीवरून तिसऱ्या देशाविरोधात अशा प्रकारची अणुबॉम्बची धमकी देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. भारतासोबतच्या संघर्षानंतर गेल्या दोन महिन्यांत मुनीर दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.
सिंधु नदीवर भारताने धरण बांधल्यास क्षेपणास्त्राने उडवू
मुनीर यांनी सिंधु नदीच्या नियंत्रणावरूनही भारताला लक्ष्य केले. मुनीर म्हणाले, भारत धरण बांधेपर्यंत आम्ही वाट पाहू आणि ते बांधल्यावर आम्ही १० क्षेपणास्त्रांनी ते नष्ट करू, सिंधू नदी ही भारतीयांची खासगी मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, असेही ते म्हणाले.
भारत स्वतःला जागतिक नेता म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तवात तो त्यापासून खूप दूर आहे. कॅनडात शीख नेत्याची हत्या, कतारमध्ये आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरण या घटनांचा संदर्भ देत, आंतरराष्ट्रीय दहशतवादात भारताच्या कथित सहभागाचे हे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
आपल्या दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेतील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. टँपा येथे मुनीर यांनी ‘यूएस सेंट्रल कमांड’चे निवृत्त होणारे कमांडर जनरल मायकल कुरिल्ला यांच्या निवृत्ती समारंभाला आणि सेंटकॉमचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणारे ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली.