भारताने भ्रमात राहू नये, पाकिस्तान कठोर प्रत्युत्तर देईल! पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांची वल्गना

संरक्षण दलाची सर्व सूत्रे हाती येताच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात पुन्हा गरळ ओकण्याचे काम केले. भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये, आपल्या देशावर कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पाकिस्तानही कठोर प्रत्युत्तर देईन, अशी वल्गना मुनीर यांनी केली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (संग्रहित छायाचित्र)
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर (संग्रहित छायाचित्र)
Published on

इस्लामाबाद : संरक्षण दलाची सर्व सूत्रे हाती येताच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताविरोधात पुन्हा गरळ ओकण्याचे काम केले. भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये, आपल्या देशावर कोणताही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पाकिस्तानही कठोर प्रत्युत्तर देईन, अशी वल्गना मुनीर यांनी केली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारलाही इशारा दिला.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर सोमवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ पदावर विराजमान झाले. रावळपिंडी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातून त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ किताब देण्यात आला. यादरम्यान संरक्षण दलाची सर्व सूत्रे हाती येताच मुनीर यांनी भारताविरोधात पुन्हा गरळ ओकण्याचे काम केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेसह देशाची सुरक्षा आणि दहशतवादासंबंधीचे अनेक मुद्दे मांडले.

तालिबानने सीमावर्ती भागात शांतता ठेवण्यास नकार दिल्यास त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तान हा एक शांतताप्रिय देश असून, त्याच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला कुणीही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची खैर केली जाणार नाही, असा इशारा मुनीर यांनी दिला. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी मोहिमेला उद्देशून असल्याचे मानले जात आहे.

मुनीर यांची चिथावणीखोर विधाने

असीम मुनीर यांची चिथावणीखोर विधाने करण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी भारताविरोधात अनेकदा गरळ ओकलेली आहे. त्यांची चिथावणीची भाषा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या आधीपासूनच सुरू आहे. एप्रिलमध्ये इस्लामाबादमध्ये केलेल्या एका भाषणातून त्यांनी १९४७ मध्ये भारताच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन केले होते. आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. काश्मीर आपल्या गळ्याची नस होती आणि ती कायमच आमच्या गळ्याची नस आहे हे आम्ही विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षाच्या काळात एकटे सोडणार नाही, असे मुनीर म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in