...तर जामनगर रिफायनरी लक्ष्य करू! पाक लष्करप्रमुख मुनीर यांची नवी धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अर्धे जग अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर आता जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीलाच लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानला बुडविण्याचा प्रयत्न झाल्यास पहिला हल्ला रिफायनरीवर करण्यात येईल, अशी धमकी मुनीर यांनी अमेरिकेतून दिली आहे.
...तर जामनगर रिफायनरी लक्ष्य करू! पाक लष्करप्रमुख मुनीर यांची नवी धमकी
Published on

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अर्धे जग अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर आता जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीलाच लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानला बुडविण्याचा प्रयत्न झाल्यास पहिला हल्ला रिफायनरीवर करण्यात येईल, अशी धमकी मुनीर यांनी अमेरिकेतून दिली आहे.

अमेरिकेतील टाम्पा शहरात पाकिस्तानी वंशाच्या लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी असीम मुनीर म्हणाले, आता जर संघर्ष सुरू झाला तर भारताच्या पूर्व भागापासून सुरुवात करत आपण पश्चिमेच्या दिशेने जाऊ. मुकेश अंबानी यांची जामनगरमध्ये जी रिफायनरी आहे ती जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. या रिफायनरीवर हल्ला करू. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तान हा अणुशक्ती असलेला देश आहे. आपण अर्धे जग घेऊन तर बुडूच, पण जर आम्हाला बुडवण्याचा प्रयत्न झाला तर पहिला हल्ला रिलायन्सच्या जामनगरमधील रिफायनरीवर करण्यात येईल, अशी धमकी असीम मुनीर यांनी दिली. भारताला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी हा उपाय आमच्याकडे उपलब्ध आहे, असेही मुनीर बरळले.

अमेरिकेतूनही मुनीर यांच्यावर टीका

मुनीर यांनी अमेरिकेतून अणुहल्ल्याबाबत धक्कादायक विधान केले. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेत येऊन असे धक्कादायक विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर केवळ भारतातूनच नव्हे, तर अमेरिकेतूनही टीका होऊ लागली आहे.

पाकचा ‘नॉन-नाटो’ सहयोगी दर्जा रद्द करा

पाकिस्तानचा ‘नॉन-नाटो’ सहयोगी हा दर्जा रद्द केला पाहिजे व त्याला दहशतवादाच्या राज्य प्रायोजकांच्या यादीत टाकले पाहिजे. अमेरिकेच्या जनरलने त्यांना बैठकीच्या बाहेर का काढले नाही, असाही सवालही रुबिन यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या जमिनीवरून पाकिस्तानचे असे विधान अस्वीकारार्ह आहे. लोकांच्या मनात प्रश्न येतोय की, पाकिस्तान आता जबाबदार देश म्हणण्याच्या लायकीचा राहिला आहे, असे म्हणणे योग्य आहे की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे, असे रुबिन यांनी म्हटले आहे.

अमेरिकन भूमीतून धमकी देणे ही गंभीर बाब

अमेरिकन भूमीतून अशी धमकी देणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि ज्या अमेरिकन जनरलने मुनीरला भाषणानंतर बैठकीच्या बाहेर काढले नाही, त्यांनीही राजीनामा द्यावा, असे मायकेल रुबिन यांनी म्हटले.

मुनीर हा लष्करी गणवेशातील लादेन - रुबिन

‘पेंटागॉन’चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी, मुनीर म्हणजे लष्करी गणवेशातील दहशतवादी ओसामा बिन लादेन असल्याची बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानला कितीही सूट दिली तरी त्यांच्या विचारात बदल होणार नाही, असे रुबिन यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in