पाकिस्तानच्या निवडणुकीत हिंसाचार; बॉम्बहल्ल्यात ४ ठार

पाकिस्तानातील सुरक्षा पाहता देशातील हंगामी सरकारने मोबाईल सेवा हंगामी स्वरूपात बंद केली.
पाकिस्तानच्या निवडणुकीत हिंसाचार; बॉम्बहल्ल्यात ४ ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान झाले. या निवडणुकीत हिंसाचार झाला असून बॉम्बहल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लष्कराचे समर्थन मिळाले आहे, तर माजी पंतप्रधान इम्रान खान हे तुरुंगात आहेत. त्यामुळे शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) हा पक्ष निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो.

उत्तर पश्चिम पाकिस्तानात बॉम्बहल्ल्यात ४ पोलिसांचा मृत्यू झाला. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतात निवडणूक सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिसांच्या वाहनावर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. यात चार पोलीस ठार, तर सहा जण जखमी झाले.

मतदानात गैरव्यवहार

पाकिस्तानात मतदानाच्या वेळी गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानातील सुरक्षा पाहता देशातील हंगामी सरकारने मोबाईल सेवा हंगामी स्वरूपात बंद केली. कराची, पेशावर या मोठ्या शहरात फोनची सेवा बंदी केली होती.

पाकिस्तानमध्ये २४ कोटींहून अधिक लोक राहतात. यंदा देशात सुमारे १२.८ कोटी मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करत आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६६ जागांवर निवडणूक होत आहे, तर ७० जागा राखीव आहेत. गेल्या ४ निवडणुकांच्या तुलनेत यावेळच्या निवडणुका सर्वात महागड्या आहेत. सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in