पाकिस्तानात पुराचा कहर : ४८ तासांत ३२० हून अधिक मृत्यू; बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने कहर केला असून, अवघ्या ४८ तासांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. यामध्ये रस्ते, पूल, इमारती, तसेच विद्युत यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत.
पाकिस्तानात पुराचा कहर : ४८ तासांत ३२० हून अधिक मृत्यू; बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले
छाया सौजन्य : एक्स (@Zicutake)
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने कहर केला असून, अवघ्या ४८ तासांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. यामध्ये रस्ते, पूल, इमारती, तसेच विद्युत यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत. दरम्यान, खैबर पख्तुनख्वा राज्यात सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, स्वात जिल्ह्यात ७ घरे पूर्णपणे नष्ट झाली असून ३८ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय, तीन शाळा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून आणखी तीन शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. नर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ९१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर स्वातमध्ये २६ घरे, तीन शाळा आणि आठ इतर सार्वजनिक इमारती कोसळल्या आहेत. सुमारे ६० हून अधिक जण या घटनेत जखमी झाले असून, अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये जीवितहानी

गिलगिट - बाल्टिस्तान भागात ५ जणांचा व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हे भागही जोरदार पावसाने बाधित झाले आहेत. दुर्गम भागांत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मात्र, खराब हवामान व तुटलेले रस्ते यामुळे मदतकार्य खंडित होत आहे. आतापर्यंत १५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, १०० हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, संचार सुविधा ठप्प असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in