पाकिस्तानकडून ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल; भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारल्याचा पाक परराष्ट्र मंत्र्यांचा गौप्यस्फोट

भारताने कधीही तिसऱ्या पक्षामार्फत मध्यस्थी स्वीकारलेली नाही, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी केला आहे. दार यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तोंडघशी पडले आहेत.
पाकिस्तानकडून ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल; भारताने तिसऱ्या देशाची मध्यस्थी नाकारल्याचा पाक परराष्ट्र मंत्र्यांचा गौप्यस्फोट
Photo : X (Ishaq Dar)
Published on

इस्लामाबाद : भारताने कधीही तिसऱ्या पक्षामार्फत मध्यस्थी स्वीकारलेली नाही, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी केला आहे. दार यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तोंडघशी पडले आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम घडवून आणल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने केला. मात्र, भारताने स्पष्ट केले की, शस्त्रसंधीबाबतची चर्चा ही द्विपक्षीय पातळीवर झाली होती.

‘अल जझिरा’शी बोलताना दार यांना जेव्हा तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्हाला काही अडचण नव्हती, परंतु भारताने स्पष्ट केले की हा द्विपक्षीय मुद्दा आहे. आम्हालाही द्विपक्षीय संवादात काही समस्या नाही, पण चर्चा व्यापक असायला हवी. त्यात दहशतवाद, व्यापार, अर्थव्यवस्था, जम्मू-काश्मीर हे सर्व मुद्दे असायला हवेत, असे ते म्हणाले.

दार पुढे म्हणाले, १० मे रोजी जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रुबियो यांच्याकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव माझ्याकडे आला, तेव्हा मला सांगण्यात आले की लवकरच भारत आणि तुमच्यात स्वतंत्र व्यासपीठावर चर्चा होईल. मात्र, २५ जुलै रोजी जेव्हा मी आणि परराष्ट्र सचिव रुबियो वॉशिंग्टनमध्ये भेटलो, तेव्हा मी विचारले की चर्चेचे काय झाले? त्यावर त्यांनी सांगितले की भारताचे म्हणणे आहे की हा द्विपक्षीय मुद्दा आहे.

आम्हाला संवाद लादायचा नाही!

दार म्हणाले, ‘आम्ही म्हटले ठीक आहे. आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी भीक मागत नाही. जर एखादा देश संवाद साधू इच्छित असेल, तर आम्हाला आनंद आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. आम्ही शांतताप्रिय देश आहोत. आमचा विश्वास आहे की, संवाद हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. पण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे जोपर्यंत भारत संवाद साधू इच्छित नाही, तोपर्यंत आम्ही जबरदस्तीने चर्चा घडवू शकत नाही. आम्हाला संवाद लादायचा नाही,' असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in