इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षावर बंदी घालण्यात येणार असल्याचा वादग्रस्त निर्णय सोमवारी पाकिस्तान सरकारने जाहीर केला.
देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवून सरकारने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून इम्रान खान आणि त्यांच्या पक्षातील दोन ज्येष्ठ सहकाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. परदेशातून मिळणारा निधी, ९ मे रोजी उसळलेली दंगल,अमेरिकेत मंजूर झालेला ठराव हे इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घालण्यासाठी विश्वसनीय पुरावे आहेत, असे माहितीमंत्री अताऊल्लाह तरार यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याविरुद्धच्या अनेक खटल्यांमध्ये ते रावळपिंडीतील अदिलिया कारागृहातच आहेत. पाकिस्तान सरकारने ‘पीटीआय’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून खान, पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अरिफ अल्वी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याचे ठरविले आहे, असे वृत्त ‘जिओ न्यूज’ने दिले आहे.
‘पीटीआय’चे अस्तित्व असेपर्यंत देशाला प्रगतीपथावर मार्गक्रमण करता येणे शक्य होणार नाही, असे तरार म्हणाले. आमच्या सहनशीलतेकडे आमचा कमकुवतपणा म्हणून पाहिले गेले. ‘पीटीआय’ आणि पाकिस्तान यांचे एकत्रित अस्तित्व शक्य नाही, कारण सरकार देशाला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या पक्षावर बंदी घालण्यासाठी आम्ही पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही तरार म्हणाले.