

काबूल : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या १८ दिवसांपासून युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धही कमालीचे पेटले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे असलेल्या एका नशा मुक्ती केंद्रावर पाकिस्तानने सोमवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर ‘पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक प्रयत्नांची मर्यादा आता संपली असून या हल्ल्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल’, असा इशारा अफगाणिस्तानने दिला आहे. तर भारताने हा हल्ला अमानुष, निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता पाकिस्तानच्या सैन्याने काबूलमधील 'उमीद अॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल' या २ हजार खाटांच्या नशा मुक्ती रुग्णालयावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे रुग्णालयाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. बचाव पथके सध्या घटनास्थळी पोहोचली असून आग आटोक्यात आणणे आणि ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काबूल येथील नशा-मुक्ती केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांचे अफगाणिस्तानातील मानवाधिकारांचे विशेष दूत रिचर्ड बेनेट यांनी या घटनेत सामान्य नागरिकांचा झालेला मृत्यू आणि जखमींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बेनेट यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत काबूल आणि इस्लामाबाद या दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कायद्यांनुसार सामान्य नागरिक, रुग्णालये आणि सार्वजनिक सुविधांचे संरक्षण करणे बंधनकारक आहे.
एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या सैन्यावर यापूर्वीही अफगाणिस्तानमधील नागरी वस्ती असलेल्या भागांवर हल्ले केल्याचे आरोप झाले आहेत. या घटनांमध्ये विविध प्रांतांमध्ये महिला आणि मुलांनाही फटका बसल्याची नोंद आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिदयांनी एका मुलाखतीत इशारा दिला की, पाकिस्तानसोबतच्या राजनैतिक प्रयत्नांची मर्यादा आता संपली आहे. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काबूलमध्ये पाकिस्तानने केलेला हल्ला अमानुष आणि निंदनीय आहे, त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई झाली पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. हा हल्ला कोणत्याही स्थितीत योग्य ठरूच शकत नाही. पाकिस्तान या हल्ल्याला लष्करी कारवाई म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करत आहे, हे रुग्णालय पूर्णपणे नागरी स्वरूपाचे असून ते कोणत्याही प्रकारे लक्ष्य मानले जाऊ शकत नाही, असे भारताने म्हटले आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात अशा प्रकारचा हल्ला होणे अधिकच निंदनीय आहे. अंतर्गत समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान सीमेपलीकडे हिंसाचाराचा मार्ग स्वीकारत असल्याते भारताने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेनेही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संस्थेने स्पष्ट केले की रुग्णालये, उपचार केंद्रे आणि इतर सार्वजनिक सुविधा यांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये. संस्थेने आंतरराष्ट्रीय समुदायाला या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याचे आणि हल्ल्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींना उत्तरदायी धरण्याचे आवाहन केले आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि या प्रकरणावर जागतिक समुदायाने शांत राहू नये, असेही त्यांनी नमूद केले.