
इस्लामाबाद : पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाचे खापर भारतावर फोडले आहे. अफगाणिस्तान भारताचे ‘प्रॉक्सी’ युद्ध लढत आहे, असा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. भारत सरकारने अजून यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोन्ही देशांमध्ये ४८ तासांसाठी युद्धविराम झाला आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानने काबूलवर एअर स्ट्राइक केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये लढाईला सुरुवात झाली. अफगाणिस्तानने त्यांच्या भूमीत एअर स्ट्राइक करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याने सीमावर्ती भागातील पाकिस्तानी चौक्यांवर मोठा हल्ला केला. यात पाकिस्तानचे ५८ सैनिक मारले गेले. त्यांच्या अनेक सैनिकांना तालिबानने बंधक बनवले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे निर्णय काबूलऐवजी दिल्लीतून होत आहेत, असा आरोप आसिफ यांनी केला आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी भारताच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाऊन योजना तयार केली, असा हास्यास्पद आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला.
पहिले झुकले कोण?
अफगाणिस्तान-पाकिस्तान सशस्त्र संघर्षात दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. त्यानंतर ४८ तासांसाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. हा अस्थायी युद्धविराम आहे. अफगाणिस्तानच्या विनंतीवरून हा युद्धविराम केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे, तर अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम लागू केल्याचे म्हटले आहे.