
वुहान: चीनने पाकिस्तानसाठी बांधलेल्या ८ अत्याधुनिक 'हंगोर' श्रेणीच्या पाणबुड्यांपैकी तिसरी पाणबुडी पाकिस्तानच्या नौदलाला सुपूर्द केली आहे. त्यामुळे चीन-पाकिस्तान संरक्षण सहकार्य अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात असून, या घडामोडीमुळे भारताच्या सागरी सुरक्षेपुढील आव्हाने अधिक गडद झाली आहेत.
चीनचे सरकारी माध्यम 'ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान येथील शिपयार्डमध्ये या तिसऱ्या पाणबुडीचा जलावतरण समारंभनुकताच पार पडला. यापूर्वी, याच मालिकेतील दुसरी पाणबुडी मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानला देण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानला चार आधुनिक लढाऊ जहाजेही पुरवली आहेत. या शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या माध्यमातून चीन पाकिस्तानला भारतावर दबाव टाकण्यासाठी एक सामरिक भागीदार म्हणून अधिक सक्षम करत आहे. चीनकडून पाकिस्तानला होणारा शस्त्रपुरवठा केवळ हा एक व्यावसायिक करार नसून, तो दक्षिण आशियातील सामरिक समीकरणे बदलणारा एक महत्त्वाचा घटक आहे. या पाणबुड्यांमुळे भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर आणि हिंदी महासागरात एक नवीन आव्हान उभे राहिले आहे, ज्याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाला आपली रणनीती अधिक मजबूत करावी लागणार आहे.
'हंगोर' पाणबुडीची वैशिष्ट्ये
चिनी लष्करी तज्ज्ञ झांग जुन्शे यांच्या मते, 'हंगोर' श्रेणीची पाणबुडी अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे ती एक धोकादायक शस्त्रप्रणाली बनते. पाण्याखालील शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यात अत्यंत संवेदनशील सेन्सर आहेत. शत्रूच्या रडारला सहज चकवा देण्याची क्षमता. जास्त काळ समुद्राच्या आत राहून मोहीम राबवण्याची ताकद.