
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेजवानी झोडली. त्यानंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कर हे ट्रम्प यांच्या कौतुकाचा वर्षाव करत आहेत. आता पाकिस्तानने शांततेच्या नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. ट्रम्प यांच्या नावाचा प्रस्ताव नोबेलसाठी पाठवल्याने जगाला धक्का बसला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या युद्धविरामाचे श्रेय ट्रम्प यांना देऊन हा प्रस्ताव पाठवला. मात्र, पाकिस्तानी नागरिकांना हा प्रस्ताव अजिबात आवडलेला नाही. सध्या इस्रायल हा इराणवर हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली. त्यावेळी अमेरिकन राष्ट्रपतींसमोर पाकिस्तानी सरकार नतमस्तक होत असल्याने त्यांना निर्लज्ज म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी नागरिक आपल्या सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत.
ते मला कधीच नोबेल देणार नाहीत - ट्रम्प
आपल्याला नोबेल पुरस्कार मिळावा, अशी ट्रम्प यांची स्वत:ची इच्छा आहे. ते सातत्याने त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावर सांगितले की, कांगो-रवांडा युद्धविराम, भारत-पाकिस्तान युद्धविराम, सर्बिया-कोसोवो युद्धविराम, इजिप्त-इथिओपियातील शांततेसाठी मला शांततेचा नोबेल पुरस्कार कधीच मिळणार नाही. माझी नियत लोकांना माहीत आहे, तीच बाब माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असे ट्रम्प म्हणाले.