"तर सर्व ओलिसांची हत्या करु"; पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवासी ओलीस, BLA ने स्वीकारली जबाबदारी

पाकिस्तानमध्ये ४५० प्रवाशांनी भरलेल्या एका ट्रेनला हायजॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. "आम्ही महिला, मुले आणि सामान्य नागरिकांना सोडले असून, आता फक्त पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी यंत्रणा (ATF) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) एजंट्स यांना ओलीस ठेवले आहे. "जर पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला...
"तर सर्व ओलिसांची हत्या करु"; पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवासी ओलीस, BLA ने स्वीकारली जबाबदारी
Published on

पाकिस्तानमध्ये ४५० प्रवाशांनी भरलेल्या एका ट्रेनला हायजॅक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जाफर एक्स्प्रेस एका रेल्वे स्टेशनजवळ पोहोचली असता एका सशस्त्र गटाने अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात ट्रेन चालक गंभीर जखमी झाला. ट्रेन क्वेट्टाहून पेशावरला जात असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. बलुचिस्तान प्रांतातील बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला अद्याप सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही प्रवासी जखमी झाले असून, ट्रेनच्या ९ डब्यांमध्ये एकूण ४५० प्रवासी होते.

प्रवाशांना ओलीस ठेवण्याची भीती

बोगद्यातून ट्रेन जात असताना बंदुकधाऱ्यांनी आत ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण ट्रेनवर ताबा मिळवला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याची शक्यता आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने जबाबदारी स्वीकारली

सोशल मीडियावर बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या गटाने हायजॅकिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी सांगितले की, "आमच्या ताब्यात आता १०० पाकिस्तानी सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत." बीएलएच्या निवेदनानुसार, महिला, मुले आणि सामान्य नागरिकांना सोडण्यात आले असून, आता फक्त पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी यंत्रणा (ATF) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) एजंट्स यांना ओलीस ठेवले आहे. "जर पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांची हत्या केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.

पोलीस घटनास्थळी दाखल, आपत्कालीन परिस्थिती जाहीर

पोलीस आणि सुरक्षा दल तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, सिबी आणि धडार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी समा टीव्हीला सांगितले की, "ट्रेन एका दुर्गम भागात हल्ल्याचा शिकार झाली आहे, त्यामुळे सुरक्षा दलांना आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत."

BLA चे संपूर्ण निवेदन:

"बलुच लिबरेशन आर्मीने मश्काफ, धडार, बोलान येथे एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या संघर्षात ६ पाकिस्तानी आर्मीचे जवान ठार झाले, तसेच १०० हून अधिक प्रवासी BLA च्या ताब्यात आहेत. ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलिस, दहशतवादविरोधी पथक (ATF) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) चे कार्यरत अधिकारी आहेत, जे पंजाबमध्ये सुट्टीसाठी प्रवास करत होते. जर पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांची हत्या करण्यात येईल. आम्ही महिला, मुले आणि बलुच प्रवाशांना मुक्त केले आहे, त्यामुळे ओलीस ठेवलेले सर्वजण पाकिस्तानी सैन्यदलाचे कार्यरत अधिकारी आहेत. ही मोहीम BLA च्या फिदायीन युनिट 'माजिद ब्रिगेड'ची असून फतेह स्क्वाड, STOS आणि गुप्तचर विभाग झिराबचा पूर्ण पाठिंबा आहे"

logo
marathi.freepressjournal.in