
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भारताशी चर्चा करुन दहशतवाद, पाकव्याप्त काश्मीर आणि द्विपक्षीय व्यापाराचे प्रश्न सोडविण्याची इच्छा असून त्यासाठी त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अब्दुल अजीज अल सौद यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली असल्याचे वृत्त पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाक सरकारने भारत सरकारसोबत संबंध सुधारण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र यापुढे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होणार, असा पवित्रा भारताने घेतला आहे. त्यामुळे आता, पाकिस्तानातील शरीफ सरकारने सौदी अरेबियाकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान त्यांनी पीओके, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवाद यावर भारताशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देणे, अटारी वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानींची व्हिसा सवलत थांबवणे, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सिंधू पाणी करार स्थगित करणे यांचा समावेश होता. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि ‘पीओके’चा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.
सिंधू पाणी करार
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावर १९६० मध्ये एक करार झाला होता. या करारानुसार, सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आला, तर पूर्वेकडील नद्यांच्या - रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. अशा प्रकारे, भारताला २० टक्के पाणी मिळाले, तर पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळाले. पाकिस्तानातील सुमारे साठ टक्के शेती याच सिंधू खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे.