लाहोर : भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्रथमच पाकिस्तानात आता संस्कृतचे धडे गिरविले जाणार आहेत. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. संस्कृत भाषेतील महाभारत आणि भगवद् गीताही विद्यार्थ्यांना शिकविली जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुढील १०-१५ वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात प्राध्यापक डॉ. शाहिद राशिद यांचा मोलाचा वाटा आहे. अरबी व फारसी भाषा आत्मसात केल्यानंतर राशिद यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन सुरू केले. संस्कृत भाषा ही पाकिस्तानशीही संबंधित असून ती फक्त एका धर्माशी संबंधित नसल्याचे राशिद म्हणाले. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राशिद यांनी सांगितले.
संस्कृतचा पाकिस्तानशी संबंध हिंदू धर्माशी संबंधित असलेली संस्कृत भाषा अभ्यासासाठी का निवडली, असा प्रश्न राशिद यांना वारंवार विचारला जातो. त्यावर राशिद म्हणाले, मला असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना विचारतो की संस्कृत भाषा का शिकू नये, संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणात लेखन हे सिंधू संस्कृतीच्या वेळी पाकिस्तानात झाले. संस्कृतचे व्याकरणकार पाणिनी यांचा जन्मही पाकिस्तानमध्ये झाला. संस्कृत भाषा आमचीही आहे. ती फक्त एका विशिष्ट धर्माशी संबंधित नाही. दरम्यान, पाकिस्तानात सुरू झालेला संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासही मदत करेल, असा विश्वास राशिद यांनी व्यक्त केला आहे.
लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेने ऐतिहासिक पाऊल उचलत संस्कृत भाषेचे शिक्षण सुरू केले आहे. यामुळे या विद्यापीठाच्या वर्गांमध्ये प्रथमच महाभारत आणि भगवद्गीता मधील श्लोकांसह संस्कृत श्लोक ऐकायला मिळाले. विद्यार्थ्यांना केवळ संस्कृत भाषाच नाही, तर 'महाभारत' या टीव्ही मालिकेचे लोकप्रिय शीर्षक गीत "है कथा संग्राम की" चे उर्दू भाषांतरही शिकवले जात आहे. पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तीन महिन्यांच्या कार्यशाळेतून या उपक्रमाची सुरुवात झाली होती. आता त्याचे रूपांतर एका पूर्ण विद्यापीठ अभ्यासक्रमात झाले आहे. २०२७ पर्यंत हा अभ्यासक्रम वर्षभराचा करण्याचा संस्थेचा मानस आहे.
पाकिस्तानात प्राचीन दस्तावेज
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात संस्कृतमधील प्राचीन दस्तावेज असल्याचे लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी म्हटले आहे. कासमी म्हणाले, पाकिस्तानमधील पंजाब विद्यापीठात पाम वृक्षाच्या पानावर लिहिलेले संस्कृत भाषेतील दस्तावेज आहेत. १९३० मध्ये संस्कृत अभ्यासक जेसीआर वुलनर यांनी हे दस्तावेज जमा केले होते. त्या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी विदेशातून अभ्यासक येतात. येथील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे दिल्यास हे चित्र बदलेल. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील.