पाकमध्ये सिंधूच्या पाण्यावरून वाद; सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर संतप्त निदर्शकांनी जाळले, पोलिसांच्या कारवाईत २ आंदोलकांचा मृत्यू

सिंधू नदीच्या पाण्यासाठी पाकिस्तानमध्ये लोकांनी सरकारविरोधात निदर्शने सुरू केली असून सिंधमध्ये मंगळवारी संतप्त नागरिकांनी एका मंत्र्याच्याच घरावर हल्ला करून ते जाळून टाकण्याची घटना घडली आहे.
पाकमध्ये सिंधूच्या पाण्यावरून वाद; सिंध प्रांताच्या गृहमंत्र्याचे घर संतप्त निदर्शकांनी जाळले, पोलिसांच्या कारवाईत २ आंदोलकांचा मृत्यू
Published on

इस्लामाबाद : सिंधू नदीच्या पाण्यासाठी पाकिस्तानमध्ये लोकांनी सरकारविरोधात निदर्शने सुरू केली असून सिंधमध्ये मंगळवारी संतप्त नागरिकांनी एका मंत्र्याच्याच घरावर हल्ला करून ते जाळून टाकण्याची घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्यासाठी गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

सरकारचा भेदभाव

पाकिस्तान सरकारने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बांधले जातील आणि त्यामुळे सिंध प्रांतात जनक्षोभ आहे. या प्रकल्पाद्वारे पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भेदभाव करत असल्याचा आरोप सिंध प्रांतातील लोकांनी केला आहे. सिंधमधील लोक सांगतात की, त्यांच्या वाट्याचे पाणी पंजाबला देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सिंधमधील महामार्गही यामुळे बंद करण्यात आले होते.

मंत्र्यांच्या घराला आग

दरम्यान, सिंधमध्ये या कालव्याच्या प्रकल्पाविरुद्धचा रोष वाढला आहे. मंगळवारी निदर्शकांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घराला आग लावली. सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांचे नौशहरो फिरोज जिल्ह्यात घर आहे. निषेधादरम्यान लोकांनी त्यांचे घर जाळून टाकले. याशिवाय घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली. घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांनाही आग लावण्यात आली. पोलिसांच्या हल्ल्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले आहेत. तसेच पोलीस उप-अधीक्षकांसह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पाकिस्तान सरकार सिंध नदीवर ६ कालवे बांधण्याच्या प्रयत्नात आहे. या कालव्यांद्वारे चोलिस्तानमधील सिंचन व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in