कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी स्फोटात प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या किमान ५२ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. काही तासांनंतर, खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एका स्फोटात किमान तीन लोक ठार झाले आणि पाच जण जखमी झाले.
बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल फलाह रोडवरील मदिना मशिदीजवळ पहिला स्फोट झाला. प्रेषित मोहम्मद यांची जयंती ईद मिलादुन नबी निमित्त लोक जमत असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. रॅलीसाठी तैनात असलेले मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, हा आत्मघाती स्फोट होता आणि बॉम्बरने डीएसपींच्या कारच्या शेजारी स्वतःला उडवून दिले. काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने मस्तुंग जिल्ह्यात इस्लामिक स्टेटच्या प्रमुख कमांडरला ठार मारल्याच्या एका दिवसानंतर हा बॉम्ब हल्ला झाला. लेहरी म्हणाले की, जखमींना रुग्णालयात हलवले जात आहे. रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
मास्तुंग येथे झालेल्या स्फोटात किमान ५२ जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रशीद मुहम्मद सईद यांनी दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
बलुचिस्तानचे अंतरिम माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, बचाव पथके मस्तुंगला रवाना करण्यात आली आहेत. गंभीर जखमींना क्वेटा येथे हलवण्यात येत असून सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
बलुचिस्तानचे काळजीवाहू मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल संपूर्ण प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अंतरिम गृहमंत्री सरफराज अहमद बुगती यांनीही या स्फोटाचा तीव्र निषेध केला.
दरम्यान, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, पवित्र प्रेषितांच्या जन्माच्या निमित्ताने असे घृणास्पद कृत्य करणे अत्यंत घृणास्पद आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला. बलुचिस्तानमधील स्फोटानंतर लगेचच, पंजाब पोलिसांनी देखील सांगितले की त्यांचे अधिकारी संपूर्ण प्रांतातील मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजासाठी सुरक्षा कर्तव्ये पार पाडत आहेत.
१५ दिवसांतील दुसरा स्फोट
गेल्या १५ दिवसांत बलुचिस्तानच्या मस्तुंगमध्ये झालेला हा दुसरा मोठा स्फोट आहे. या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात झालेल्या स्फोटात किमान ११ जण जखमी झाले होते. मास्तुंग हे गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य राहिले आहे आणि जुलै २०१८ मधील हल्लात किमान १२८ लोक मारले गेले होते. या प्रदेशात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा असे अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत.