

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाची निर्मिती असलेल्या 'पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स' या माहितीपटाची प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरपूर वारीची भक्तिमार्गातली समृद्ध परंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांच्यामार्फत निर्मित या माहितीपटाचे डिस्कवरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात आले आहे.
संतपरंपरा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा जागतिक प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी २२ मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.
वारीच्या गौरवशाली परंपरेचा बहुमान
पंढरपूर वारी ही भक्तीमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून ती जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी माहिती तयार करण्यात आलेल्या माहितीपटाला मिळालेला पुरस्कार म्हणजे वारीच्या गौरवशाली परंपरेचा आंतरराष्ट्रीय बहुमान असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.