बॉम्बहल्ले, गोळीबाराच्या वातावरणात शांतता चर्चेला यश मिळणे दुरापास्त, मोदींचा पुतिन यांना सल्ला

'ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्रू दी अपोस्टल' हा रशियातील सर्वोच्च नागरी किताब मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला.
बॉम्बहल्ले, गोळीबाराच्या वातावरणात शांतता चर्चेला यश मिळणे दुरापास्त, मोदींचा पुतिन यांना सल्ला
ANI
Published on

'ऑर्डर ऑफ सेंट ॲण्ड्रू दी अपोस्टल' हा रशियातील सर्वोच्च नागरी किताब मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी मोदी यांनी केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल मोदी यांना या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले. रशियातील हा सर्वोच्च किताब आपण भारतवासीयांना समर्पित करीत आहोत, असे मोदी यांनी किताब स्वीकारल्यानंतर ‘एक्स’वर म्हटले आहे.

मॉस्को : बॉम्बहल्ले, बंदुका आणि गोळीबाराच्या वातावरणात केलेल्या शांतता चर्चेला यश मिळत नाही, त्याचप्रमाणे युद्धभूमीत कोणत्याही संघर्षावर तोडगा निघू शकत नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिला. रशियाने युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामध्ये अनेक निष्पाप लहानग्यांचा बळी गेला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे, असेही मोदी म्हणाले. युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

भारत शांततेच्या बाजूने असून युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहे, असेही मोदी यांनी पुतिन यांच्याकडे स्पष्ट केले आणि जागतिक समुदायालाही संदेश दिला. नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता प्रस्थापित होणे गरजे आहे. बॉम्बहल्ले, बंदुका आणि गोळीबाराच्या वातावरणात शांतता चर्चा यशस्वी होऊ शकत नाही, असेही पंतप्रधान म्हणाले. मानवतेवर ज्यांचा विश्वास आहे, त्या प्रत्येकाला जीवितहानी झाली की वेदना होतात, तशातच निष्पाप लहानग्यांची हत्या झाल्यास हृदय पिळवटून जाते, असे मोदी म्हणाले. मोदी आणि पुतिन यांनी सोमवारीही चर्चा केली आणि युक्रेनबाबत एकमेकांचे विचार ऐकून घेतले. ऊर्जा क्षेत्रात रशियाने भारताला केलेल्या मदतीचा मोदी यांनी उल्लेख केला.

जगात जेव्हा अन्न, इंधन आणि खतांचा तुटवडा होता, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणतीही समस्या भेडसावू दिली नाही आणि त्यासाठी मित्र देश रशियाने सहकार्य केले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दोन्ही देशांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची आमची इच्छा आहे, असे मोदी म्हणाले. दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करताना मोदी म्हणाले की, भारत गेल्या ४० वर्षांपासून दहशतवादाचा मुकाबला करीत आहे, आपण सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. गेल्या पाच वर्षांत जगासमोर अनेक आ‌व्हाने होती, प्रथम कोविड-१९ मुळे आणि उर्वरित अनेक प्रकारच्या संघर्षामुळे, असेही पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in