मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्प यांची भेट टाळली; 'आसियान' शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहणार

या शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा निर्णय पंतप्रधानांनी स्वतः गुरुवारी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला.
मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्प यांची भेट टाळली; 'आसियान' शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहणार
Photo : X (Narendra Modi)
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या अखेरीस क्वालालंपूर येथे होणाऱ्या ‘आसियान’ शिखर परिषदेसाठी आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी क्वालालंपूरला जाणार असल्याची शक्यता आहे, असे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना भेटणे पुन्हा एकदा टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.

या शिखर परिषदेला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा निर्णय पंतप्रधानांनी स्वतः गुरुवारी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला. ‘माझे मित्र, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी उत्तम चर्चा झाली. मलेशियाला आसियान शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, आसियान-भारत शिखर परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी होण्यासाठी आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी नरेंद्र मोदी २०१४ ते २०१९ दरम्यान झालेल्या प्रत्येक शिखर परिषदेला उपस्थित होते. तर २०२० आणि २०२१ च्या शिखर परिषदा कोविड-१९ मुळे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.

गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा भाग म्हणून भारताने १० सदस्यीय ‘आसियान’ गटाशी संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी या शिखर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याच्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बच के रहना रे बाबा, काँग्रेसची टीका

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणारी भेट टाळण्यासाठीच मोदी हे ‘आसियान’ शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ट्रम्प यांनी आपल्याला कोंडीत पकडू नये यासाठीच मोदी जाणार नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांची स्तुती करणारे संदेश समाज माध्यमांवर टाकणे ही एक बाजू आहे, परंतु ज्या व्यक्तीने ‘ऑपरेशन सिंदूर’ आपणच थांबविल्याचा दावा ५३ वेळा केला आणि रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचे भारताने आश्वासन दिल्याचा दावा पाच वेळा केला, त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणे मोदी यांच्यासाठी जोखमीचे ठरू शकते, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

भेटीच्या चर्चेला पूर्णविराम

ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या ‘ट्रुथ’ सोशल प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि अमेरिका तणावानंतर पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या मार्गावर असल्याने येत्या आठवड्यात मोदींना भेटण्यास ते उत्सुक आहेत. यामुळे दोन्ही नेते ‘आसियान’ शिखर परिषदेत भेटू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, मोदी आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in