पोप फ्रान्सिस यांचं निधन; व्हॅटिकन सिटीमध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हॅटिकनच्या 'कासा सांता मार्टा' येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पोप फ्रान्सिस यांचं संग्रहित छायाचित्र
पोप फ्रान्सिस यांचं संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी (दि.२१) निधन झालं. गेल्या काही काळापासून ते आजारपणाने ग्रस्त होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. व्हॅटिकनच्या 'कासा सांता मार्टा' येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनकडून पोप यांच्या निधनाच्या वृत्ताची माहिती देण्यात आली आहे.

पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू

पोप फ्रान्सिस रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया होता, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते बराच काळ रुग्णालयात होते. ३८ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर अलीकडेच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा येथील त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे व्हॅटिकनने सोमवारी एक निवेदन जारी करून सांगितले.

पोप बनणारी युरोपबाहेरील पहिली व्यक्ती

पोप यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला होता आणि त्यांचे मूळ नाव जॉर्ज मारियो बेर्गोलियो होते. पोप फ्रान्सिस २०१३ पासून या पदावर होते. पोप बेनेडिक्ट XVI यांच्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले होते. कार्डिनल मंडळाने त्यांची निवड २६६वे पोप म्हणून केली होती. कोणत्याही युरोपबाहेरील व्यक्तीस पोप बनवण्याची ही पहिलीच वेळ होती.

पोप फ्रान्सिस यांनी रविवारी इस्टरच्या निमित्ताने अचानक सार्वजनिक दर्शन दिले होते. त्यांनी सेंट पीटर स्क्वेअरमधील जवळपास ३५,००० लोकांच्या गर्दीचे अभिवादन स्वीकारताना दिसले होते. व्हॅटिकनचे कार्डिनल केविन फेरेल यांनी सांगितले की, पोप फ्रान्सिस यांचे संपूर्ण आयुष्य ईश्वराच्या सेवेसाठी समर्पित होते.

पंतप्रधान मोदी, फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

"ब्यूनोस आयर्सपासून रोमपर्यंत, चर्चने गरिबांसाठी आनंद आणि आशा, अपेक्षा घेऊन यावे, अशी पोप फ्रान्सिस यांची इच्छा होती. मानवजातीमध्ये आणि निसर्गाशी एकता निर्माण करावी. ही आशा त्यांच्या पलीकडेही सतत पुनरुज्जीवित होत राहो", असे म्हणत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी पोप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तर, पोप फ्रान्सिस हे जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी करुणा, विनम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील. लहानपणापासूनच ते प्रभु येशू ख्रिस्तांच्या आदर्शांचा पाठपुरावा करत जीवन जगले. त्यांनी गरिबांच्या, उपेक्षितांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले, असे म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in