ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; व्हॅटिकनकडून शोकसंदेश, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

अनेक महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत असलेले रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.
ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन; व्हॅटिकनकडून शोकसंदेश, मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Published on

व्हॅटिकन सिटी : अनेक महिन्यांपासून आजारपणाशी झुंज देत असलेले रोमन कॅथलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी व्हॅटिकन सिटी येथे अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त होत आहे.

व्हॅटिकनमधील प्रशासनाने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती ढासळली होती, पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली. पोप फ्रान्सिस यांनी संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातली मूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेम यांचा संदेश दिला, असे व्हॅटिकनने म्हटले आहे.

रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना १२ वर्षांच्या काळात पोप फ्रान्सिस यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तसेच अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले होते. मार्च २०२३ मध्ये त्यांना ब्राँकायटिसमुळे तीन दिवस रुग्णालयात राहावे लागले होते. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळे त्यांना २०२३ मध्ये यूएईमध्ये झालेल्या हवामान परिषदेलाही उपस्थित राहता आले नव्हते.

पेंट हाऊस नाकारले

आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील भलेमोठे पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारले आणि स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटे घर निवडले होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचीही चर्चा झाली होती. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत परवलीचा शब्द असलेल्या मुक्त-बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा त्यांची माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकांमुळेही ते चर्चेत राहिले.

फ्रान्सिस यांनी रविवारी ईस्टरनिमित्त सेंट पीटर स्क्वायर येथे उपस्थित असलेल्या हजारो ख्रिस्ती अनुयायांना दर्शन देत त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला होता. पोप फ्रान्सिस यांचे संपूर्ण जीवन हे ईश्वरसेवेमध्ये समर्पित राहिले होते, अशा शब्दांत व्हॅटिकन सिटीचे कार्डिनल केविन फेरेल यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

करुणा, नम्रता व आध्यात्मिक धैर्य यांचे प्रतीक - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना ‘एक्स’वर पोस्ट टाकून श्रद्धांजली वाहिली. पवित्र पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. या दुःखाच्या आणि आठवणीच्या क्षणी, जागतिक कॅथॉलिक समाजाला माझ्या मनापासून संवेदना. जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी पोप फ्रान्सिस हे करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्य यांचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील, असे मोदी यांनी म्हटले आहे. माझ्या त्यांच्याशी झालेल्या भेटी नेहमीच स्मरणात राहतील. सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या असलेल्या बांधिलकीने मला फार प्रेरणा दिली. भारतातील जनतेप्रति असलेले त्यांचे प्रेम सदैव स्मरणात राहील.

नवीन पोप कोण?

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी पदासाठी जगभरातील १२ प्रमुख कार्डिनल्सच्या नावांवर चर्चा सुरू झाली आहे. पोपपदाच्या निवडीसंदर्भातील ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि आध्यात्मिक असली तरी काही नावे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत.

अंगठी फोडण्याचा विधी

पोप यांचा मृतदेह विशेष खासगी प्रार्थना कक्षात ठेवला जातो, त्याला पांढऱ्या वस्त्रात आणि झिंकयुक्त लाकडी ताबुतात ठेवले जाते. पोपचा 'फिशरमॅन रिंग' विधीपूर्वक फोडला जातो. जेणेकरून त्यांच्या पदाचा शेवट अधिकृतपणे दर्शवता येतो. ही अंगठी म्हणजे पोप यांचे अधिकृत सील किंवा मुद्रांक असतो. या अंगठीवर सेंट पीटर (जे ख्रिस्ताचे शिष्य आणि पहिले पोप मानले जातात) यांना मासेमारी करताना दाखवलेले चित्र कोरलेले असते. म्हणून याला 'फिशरमॅन रिंग' म्हणतात. या अंगठीचा उपयोग पोप अधिकृत दस्तावेजांवर शिक्का मारण्यासाठी करतात. पोपच्या मृत्यूनंतर या अंगठीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ती विधीपूर्वक फोडली जाते.

काँक्लेव्ह आणि नवीन पोपची निवड

पोप यांच्या निधनानंतर १५-२० दिवसांत काँक्लेव्ह भरते, त्यामध्ये ८० वर्षांखालील कार्डिनल्स मतदान करतात. निवडीसाठीची प्रक्रिया व्हॅटिकन सिटीमध्ये सिस्टीन चॅपेलमध्ये चेंबरलिन चर्चच्या देखरेखीखाली पार पडते. जगभरातील कार्डिनल नवीन पोप निवडण्यासाठी मतदान करतात. त्यासाठी ते व्हॅटिकन सिटीमध्ये येतात. कार्डिनल ही रोमन कॅथॉलिक चर्चमधील एक उच्च पदवी आहे, जे पोपचे सल्लागार म्हणून काम करतात. मतदानाआधी एक धार्मिक सभा होते, ज्यात कार्डिनल सहभागी होतात. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू होते. सिस्टीन चॅपेलमध्ये दररोज चार वेळा मतदान केले जाते, जोपर्यंत एखाद्या उमेदवाराला दोन-तृतीयांश मते मिळत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली जाते.

१३८ कार्डिनल पात्र

२१ एप्रिल २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार सध्या एकूण २५२ कार्डिनल आहेत, परंतु नव्या पोपच्या निवडीसाठी १३८ कार्डिनल पात्र आहेत. नव्या पोपच्या निवडीचा संकेत सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चिमणीतून येणाऱ्या धुराद्वारे मिळतो. जर चिमणीतून पांढरा धूर निघाला, तर याचा अर्थ नव्या पोपची निवड झाली आहे. काळा धूर निघाला, तर याचा अर्थ निवड अद्याप झाली नाही आणि प्रक्रिया सुरूच आहे.

चार भारतीय कार्डिनलना पोप निवडीत मतदानाचा हक्क

परंपरेनुसार, ८० वर्षांखालील १३८ कार्डिनल्सची काँक्लेव्ह (गोपनीय सभा) बोलावली जाईल, जे पुढील पोपची निवड करतील. माध्यमांमधील वृत्तानुसार, या यादीत ४ भारतीय कार्डिनल्सचाही समावेश आहे. भारतामध्ये एकूण ६ कार्डिनल्स आहेत, पण त्यापैकी दोघे ८० वर्षांहून अधिक वयाचे असल्याने त्यांना नवीन पोपच्या निवडीत मतदानाचा अधिकार नाही.

कार्डिनल जॉर्ज जेकब कुवकड

कार्डिनल जॉर्ज जेकब कुवकड हे भारतातील सर्वात तरुण कार्डिनल आहेत. त्यांचे वय ५१ वर्षे आहे. केरळच्या सायरो-मलबार चर्चचे आर्च बिशप असलेले जॉर्ज हे व्हॅटिकनचे मुत्सद्दी आहेत.

कार्डिनल अँथनी पूला

भारतातील पहिले दलित कार्डिनल होण्याचा मान अँथनी पूला यांना मिळाला आहे. ते ६३ वर्षांचे आहेत. त्यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती ही जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.

कार्डिनल क्लीमिस बासेलिओस

बासेलिओस यांचे वय ६४ वर्षे असून ते तिरुवनंतपूरमचे मेजर आर्च बिशप आणि सायरो मलंकरी कॅथोलिक चर्चचे मेजर आर्च बिशप-कॅथोलिकोस आहेत. १९८६ मध्ये त्यांनी पाद्री पदाची दीक्षा घेतली आणि २६ वर्षांनी त्यांना कार्डिनल म्हणून बढती मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in