
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1,388 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या 6 हजार 400 हून अधिक आहे. सोमवारी सकाळी 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तुर्की आणि सीरिया हादरले. या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशांतील शेकडो इमारती कोसळल्या. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. काहींची घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानंतर सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी बैठक बोलावून तुर्की आणि सीरियाला मदत पाठवण्याबाबत चर्चा केली. एनडीआरएफचे जवान आणि बचाव पथक तुर्की आणि सीरियाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय औषधे, गोळ्या, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय मदत पाठवली जाईल. तुर्कीला स्थानिक वेळेनुसार पहाटे ४:१७ वाजता भूकंपाचा धक्का बसला. तुर्कीच्या गझियानटेपजवळ भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यूएस भूगर्भीय सेवेनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे तुर्कस्तान आणि सीरियाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. व्हिडीओजमध्ये अनेक इमारती कोसळल्या असून जमीन उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे.