अमेरिकेसह जगभरातील रामभक्तांनी साजरा केला प्राणप्रतिष्ठा सोहळा

अमेरिकेच्या बाहेर त्रिनिदाद, टोबॅगो, कॅरेबियन या देशांत देखील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला.
अमेरिकेसह जगभरातील रामभक्तांनी साजरा केला प्राणप्रतिष्ठा सोहळा

वॉशिंग्टन : अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्कंठा जगभरातील रामभक्तांना लागली होती. यामुळे सोमवारी अयोध्येत हा सोहळा सुरू असताना जगभरातील श्रीराम भक्तांनी हा सोहळा आपापल्या परीने जल्लोषात साजरा केला. अमेरिकेत न्यूयॉर्कमधील भारतीयांनी तेथील टाइम स्क्वेअरवर या प्रसिद्ध ठिकाणी प्रार्थना म्हटली, कार मिरवणूक काढली तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले.

तसेच अयोध्येत होत असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह स्क्रीनिंग देखील न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये करण्यात आले होते. यामुळे टाइम स्क्वेअर पूर्णपणे राममय झाला होता. लोक पारंपरिक भारतीय पोषाखांमध्ये जमले होते. गात होते. भजने म्हणत नाचत होते. अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळील व्हर्जिनिया शहरात देखील लोटस मंदिर आहे. तेथे श्रीरामाचा जयघोष सुरू होता. त्या कार्यक्रमास भारतीय शीख, मुस्लीम आणि पाकिस्तानी मुस्लीम देखील उपस्थित होते. तेथे रविवारी उत्सव साजरा करण्यात आला. सुमारे २५०० लोक जमा झाले होते. अमेरिकेचा एक शेअर बाजार नॅसडॅकच्या स्क्रीनवर राम मंदिराचे फोटो झळकले होते. ग्रेटर ह्युस्टन येथे देखील विविद देशातील रामभक्तांनी श्रीरामाच्या जयघोषाचे आयोजन केले होते. तसेच लॉस एंजेल्स या अमेरिकेतील अन्य मोठ्या शहरात १००० रामभक्तांनी जमून प्रार्थना केली तसेच २५० कारची मिरवणूक काढली. अयोध्येत राम मंदिराचे अनावरण होताच अमेरिकेतील जागतिक हिंदू परिषद आणि कॅनडातील विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर यात्रा काढण्याची घोषणा केली. यात किमान एक हजार भक्त सहभागी होणार आहेत. ही यात्रा २५ मार्च रोजी मॅसॅच्युसेटमधील बिलेरिका स्थित ओम हिंदू सेंटरपासून सु‌‌‌रू होणार आहे. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती घेऊन ही यात्रा वाटचाल करणार आहे. यात्रेदरम्यान किमान १ हजार मंदिरांना भेट दिली जाणार आहे. अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहिलेले अमेरिकेच्या विश्वहिंदू परिषदेचे प्रतिनिधी या यात्रेच्या माध्यमातून स्वत: प्रसाद आणि अक्षतांचे वाटप करणार आहेत. ही यात्रा ४५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून संपूर्ण अमेरिका आणि कॅनडात फिरणार आहे.

अमेरिकेच्या बाहेर त्रिनिदाद, टोबॅगो, कॅरेबियन या देशांत देखील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. तेथे सुमारे पाच हजार लोक जमले होते. दुसरीकडे मॉरिशस देशात सरकारने या सोहळ्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन तास सुट्टी जाहीर केली होती. तेथील पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी जय हिंद! जय मॉरिशस! चा नारा एक्सवर प्रसिद्ध केला. जनतेने देखील रामभजने म्हटली. मेक्सिको शहरात देखील श्रीराम मंदिर आहे. तेथे हनुमान मंदिर देखील आहे. तेथे प्राणप्रतिष्ठा सोहळा अमेरिकन धर्मगुरू आणि मेक्सिकन यजमानांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. २५० जण या सोहळ्यास उपस्थित होते. फिजीमध्ये १८ ते २२ जानेवारी या दरम्यान रामलल्ला उत्सव साजरा करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in