वातावरण बदलामुळे अकाली मृत्यू

आजार वाढले : गरम हवेचा परिणाम
वातावरण बदलामुळे अकाली मृत्यू

वॉशिंग्टन : जगभरात वातावरण बदलाची चर्चा जोरात सुरू आहे. या वातावरण बदलाचा मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत आहे, मात्र त्याची जाणीव आपल्याला नाही. या वातावरण बदलामुळे पृथ्वीवर आजारपण वाढले असून अकाली मृत्यू होत आहेत, अशी खळबळजनक माहिती अमेरिकेतील मॅगेझिन ‘ग्रिस्ट’ने दिली आहे.

गेल्या शतकात लोक दीर्घायुषी होते. आता असे होत नाही. वातावरण बदल माणसाचे आयुष्यमान कमी करत आहे. याचे एक कारण जनावरे व जीवजंतू आहेत. वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढत असून त्यातून जागतिक तापमानात वाढ होत आहे. पृथ्वी तापत असून जनावरेही वातावरण बदलाचे कारण बनत आहेत.

मानवाने जंगले कापून तेथे उद्योग उभारले. त्यामुळे मानवाचा जनावरे, डास, जीवाणू, बुरशी यांच्याशी संबंध वाढला. हे जीव-जंतू स्वत:ला बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत. त्यामुळे अनेक आजार पसरत आहेत. ते आमच्या जीवनासाठी खतरनाक आहेत.

माणूस आपल्या जीवनासाठी अनेक जीवांवर अवलंबून आहे. स्वत:च्या अस्तित्वासाठी त्यांना खात असतो. त्यामुळे या जीवांमध्ये वाढणाऱ्या जीवाणूंच्या थेट संपर्कात येतो. हे जीवाणू आजार पसरवणारे आहेत. या सर्व प्रकारामुळे आजारपण वाढवणारी परिस्थिती बनवत आहेत. नवनवीन आजार वाढत आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

अकाली मृत्यू वाढणार

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, वातावरण बदलामुळे २०३० ते २०५० दरम्यान मलेरिया व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे अडीच लाख जणांचा मृत्यू होईल.

लंडन स्कूल ऑफ हायजिन ॲँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूला माणूस जबाबदार आहे. १९९१ ते २०१८ दरम्यान उष्णतेमुळे झालेल्या ३७ टक्के मृत्यूंना मानवाची वागणूक जबाबदार आहे. तापमानवाढीनंतर हवा गरम होते. त्याचा थेट परिणाम ज्येष्ठ नागरिक व अस्थमा रुग्णांवर होतो. परिणामी अकाली मृत्यूचे प्रमाण वाढते. तापमान वाढल्याने आरोग्याशी संबंधित समस्या वाढल्या आहेत.

बर्न विद्यापीठातील शास्त्रज्ञ एना एम. म्हणाल्या की, जागतिक तापमानात एक अंश वाढ झाली असून ते असेच वाढत राहिल्यास मृत्यूचे आकडे वाढू लागतील.

समुद्र सपाटीच्या भागात राहणारी जनावरेही वाढते तापमान सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ते उंच व थंड जागेत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे हे आजारही तिथे जात आहेत.

विषाणू पसरवणारे कीटक अतिक्रियाशील

उष्णतेमुळे विषाणू पसरवणारे कीटक मच्छर, माश्या अतिक्रियाशील असतात. तसेच एक पक्षी दुसऱ्या पक्ष्यांमध्ये विषाणू पसरवत आहेत. त्यानंतर ते मनुष्यापर्यंत पोहचत आहेत.

अति उष्ण, अति थंड वातावरण आजारांना जन्म देते

अति उष्ण, अति थंड वातावरण आजारांना जन्म देत असल्याचे आढळले. जास्त उष्णतेमुळे अनेक देशांत दुष्काळ पडतो. त्यातून नागरिकांच्या पोटात अल्सर किंवा युरिन इन्फेक्शन होते, तर अनेक देशांत जास्त पाऊस पडत असल्याने फंगल इन्फेक्शन, कावीळ आदी आजार पसरत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in