
एखाद्याला कर्करोगाचे निदान झाल्यानंतर जीवघेण्या उपचारांना सामोरे जावे लागते. नानाविध उपचार केल्यानंतरही कर्करोग पूर्णपणे बरा होतोच असे नाही, तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो; पण विशिष्ट उपचाराअंती आता कर्करोग पूर्णपणे नाहीसा करण्यात शास्त्रज्ञांना ऐतिहासिक यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांनी कर्करोगाविरोधात जालीम औषध तयार केले असून त्यामुळे कॅन्सर काही दिवसांतच गायब होतो. या औषधाची रुग्णांवरील चाचणी १०० टक्के यशस्वी ठरली आहे. चाचणीनंतरचा अहवाल पाहून डॉक्टरही अवाक झाले आहेत.
अगदी छोट्या स्तरावर कर्करोग असलेल्या रुग्णांवर डोस्टारलिमॅब औषधाची चाचणी घेण्यात आली. १२ रुग्णांना सहा महिन्यांच्या कालावधीकरिता हे औषध देण्यात आले. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आल्यावर त्यांच्यापैकी प्रत्येकाचा ट्यूमर नाहीसा झाल्याचे निष्पन्न झाले. डोस्टारलिमॅब हे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले औषध मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंड म्हणून काम करते. संबंधित रुग्णांची शारीरिक तपासणी करण्यात आली. एंडोस्कोपी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन तसेच एमआरआय स्कॅन केल्यानंतर त्यांच्यात कर्करोगाची कोणतीही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळली नाहीत. कर्करोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे, अशी प्रतिक्रिया न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुइस ए. डायझ ज्युनियर यांनी व्यक्त केली.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने तयार केले हे औषध आहे. रेक्टल कॅन्सरच्या रुग्णांवर या औषधाची यशस्वी चाचणी झाली असून ज्याचे परिणाम हैराण करणारे आहेत. डॉ. लुइस म्हणाले की, “कर्करोगाच्या इतिहासात क्रांती घडून आली आहे. या रुग्णांनी सहा महिने दर तीन आठवडे हे औषध घेतले. सर्व रुग्ण कर्करोगाच्या सारख्या टप्प्यात होते.” संशोधनाच्या सहलेखिका डॉ. अँड्रिया सेर्सेक मेमोरियअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये ऑन्कोलॉजिस्ट आहेत. त्या म्हणाल्या की, “जेव्हा परिणाम समोर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. या संशोधनानंतर आनंदी झालेल्या रुग्णांचे बरेच ई-मेल आले. जे वाचून माझ्या डोळ्यात अश्रू तरळले.”