

नवी दिल्ली / मुझफ्फराबाद : ४० सीआरपीएफ जवानांचा बळी घेणाऱ्या अत्यंत भीषण अशा २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि 'अल बद्र' या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कमांडर हमजा बुरहान उर्फ 'डॉक्टर' याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे हा थरार घडला असून, अनेक गोळ्या लागल्यामुळे बुरहानचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
मूळचा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला हम्झा बुरहान २०१७ मध्ये उच्च शिक्षणाच्या बहाण्याने पाकिस्तानात गेला होता. मात्र, तिथे गेल्यावर तो 'अल बद्र' या दहशतवादी संघटनेत सामील झाला. अल्पावधीतच त्याने आपल्या क्रूर कारवायांमुळे ‘कमांडर’ पदापर्यंत मजल मारली.
बुरहान मूळचा पुलवामाचा रहिवासी
भारत सरकारने २०२२ मध्ये बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याला अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले होते . तो अबू दुजाना, अबू कासिम, बुरहान वानी आणि झाकीर मुसा यांच्या जवळचा होता. २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी तो एक मानला जात होता, ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नोंदीनुसार, २३ वर्षीय अर्जुमंद गुलजार दार उर्फ हमजा बुरहान हा मूळचा पुलवामाचा रहिवासी होता.
हल्लेखोरांना स्फोटके, ग्रेनेड पुरवले...
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथपोरा (पुलवामा) येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या बसवर धडकवली होती. या भीषण हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. बुरहानने या हल्ल्यासाठी ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून काम केले होते आणि हल्लेखोरांना स्फोटके व ग्रेनेड पुरवले होते. या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअरस्ट्राइक करून जैशच्या तळांचा खात्मा केला होता. गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांना अज्ञात हल्लेखोरांकडून टार्गेट केले जाण्याची ही नवीन घटना नाही.