रशिया-युक्रेनमध्येही ३२ तासांचा युद्धविराम; ‘इस्टर’ सणानिमित्त दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी जाहीर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ‘ऑर्थोडॉक्स इस्टर’ सणानिमित्त ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली असून युक्रेननेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रशिया-युक्रेनमध्येही ३२ तासांचा युद्धविराम; ‘इस्टर’ सणानिमित्त दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी जाहीर
रशिया-युक्रेनमध्येही ३२ तासांचा युद्धविराम; ‘इस्टर’ सणानिमित्त दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी जाहीर
Published on

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ‘ऑर्थोडॉक्स इस्टर’ सणानिमित्त ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली असून युक्रेननेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मॉस्कोमधील वेळेनुसार शनिवारी दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होणारी ही शस्त्रसंधी रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील ‘इस्टर’ उत्सवादरम्यान लष्करी कारवाया थांबवल्या जाणार आहेत.

रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव यांनी मुख्य जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना या कालावधीत सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, युक्रेनकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन सैन्य सज्ज असेल, असेही क्रेमलिनने स्पष्ट केले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून युक्रेन या शस्त्रसंधीचा आदर करेल, असे सांगितले. युक्रेनने यापूर्वीच अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता आणि त्यास अनुसरून पावले उचलली जातील, असे झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’वर नमूद केले. नागरिकांना कोणत्याही धोक्याशिवाय ‘इस्टर’ सण साजरा करता यावा आणि रशियाने या सणानंतरही हल्ले करू नयेत, असे आवाहन झेलेन्स्की यांनी यावेळी केले.

शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर रशियाच्या हल्ल्यात २ ठार

दरम्यान, या घोषणेनंतर काही तासांतच निप्रोपेट्रोव्स्क प्रांतात रशियन हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शत्रूने ड्रोन आणि तोफखान्याच्या सहाय्याने या भागावर जवळपास ३० वेळा हल्ले केल्याची माहिती राज्यपाल आलेक्झांडर गांझा यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in