भारत-अमेरिका भागीदारीत 'क्वाड' उपग्रह; अमेरिकेच्या भारतातील राजदूतांचा प्रस्ताव

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीत 'क्वाड' उपग्रह विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
भारत-अमेरिका भागीदारीत 'क्वाड' उपग्रह; अमेरिकेच्या भारतातील राजदूतांचा प्रस्ताव
X/@USAmbIndia
Published on

बंगळुरू : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीत 'क्वाड' उपग्रह विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 'क्वाड' हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा गट आहे. गार्सेटी यांनी शनिवारी बंगळुरूत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि अन्य वरिष्ठ शास्त्रज्ञांबरोबर भारत-अमेरिका अंतराळ सहकार्यावर चर्चा केली. त्यानंतर इस्रोने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान इस्रोच्या अध्यक्षांनी उपग्रहांचा वापर अधिक सक्षम करण्यासाठी, उपग्रहांची दिशादर्शन (नेव्हिगेशन) प्रणाली तयार करण्यासाठी, तसेच मानवी अंतराळ मोहिमांमध्ये सहकार्य करण्याबाबत गार्सेटी यांच्याबरोबर चर्चा केली. अमेरिका-भारत शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे प्रगत डिटेक्टर आणि पॅकेजिंग तंत्रज्ञान विकसित करण्याच्या संधीकडे लक्ष वेधले. पर्यावरण आणि हवामान बदलासाठी जी-२० उपग्रहाच्या भारताच्या प्रस्तावामध्ये 'नासा'चा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) मालवाहतूक करण्यासाठी पर्याय म्हणून गगनयान कार्गो मोड्यूलचा विकास करणे, या विषयांवरही चर्चा झाली. गार्सेट्टी यांनी व्यावसायिक अंतराळ उपक्रमांना चालना देण्यासाठी अंतराळ विभागाच्या भूमिकेबद्दलदेखील चौकशी केली. पेलोड तंत्रज्ञान आणि स्पेस-बाउंड हार्डवेअर प्रथमच भारतीय सुविधांमध्ये तयार केले जात आहेत, असे सोमनाथ यांनी सांगितले. इस्रोने आपल्या अंतराळ उपक्रमांसाठी भारतीय कंपन्यांकडून पेलोड्स आणि उपग्रह मिळवण्याची आणि त्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास सक्षम करण्याची योजना आखली आहे.

अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या अंतराळ संशोधनातील अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य सुरू आहे. त्यात आर्टेमिस अकॉर्ड, निसार प्रणाली आणि चांद्रयान-३ वरील लेझर रिफ्लेक्टोमीटर ॲरेचा वापर आदी बाबींचा समावेश आहे. आर्टेमिस ॲकॉर्ड्सने सहयोगी राष्ट्रांच्या चंद्राच्या आणि त्यापुढील अंतराळ संशोधन मोहिमांसाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. निसार ही नासा आणि इस्रोमधील संयुक्त पृथ्वी-निरीक्षण उपग्रह मोहीम आहे. लवकरच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून निसार उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याद्वारे परिसंस्था, पृथ्वीचा पृष्ठभाग, नैसर्गिक धोके, समुद्र पातळी वाढणे आणि क्रायोस्फीअर यासह अन्य संसाधनांचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी विविध संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात आले आहेत.

भारतीय अंतराळवीरांना 'नासा'कडून प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) संयुक्त मोहीम पाठवण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) ही अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था लवकरच भारतीय अंतराळवीरांना प्रगत प्रशिक्षण प्रदान करेल, असे भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी सांगितले. यंदा किंवा पुढील वर्षी हा कार्यक्रम सुरू होईल. बंगळुरू येथे 'यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल' आणि 'यूएस कमर्शियल सर्व्हिस' यांनी आयोजित केलेल्या 'यूएस-इंडिया कमर्शियल स्पेस कॉन्फरन्स: अनलॉकिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर यूएस अँड इंडियन स्पेस स्टार्टअप्स' या कार्क्रमात ते बोलत होते.

logo
marathi.freepressjournal.in