अमेरिकेत हेरगिरीसाठी ई-पँट्सचे संशोधन - सरकारकडून २२ दशलक्ष डॉलर्सची तरतूद

नॉटिलस डिफेन्स, लिडोज, एमआयटी, एसआरआय इंटरनॅशनल आणि अरिते यांचा समावेश आहे
अमेरिकेत हेरगिरीसाठी ई-पँट्सचे संशोधन - सरकारकडून २२ दशलक्ष डॉलर्सची तरतूद

वॉशिंग्टन : जेम्स बाँडच्या चित्रपटांमधून आपण हेरगिरीसाठी वापरली जाणारी चित्रविचित्र उपकरणे पाहिलेली असतात. त्यातील काही खरोखर अस्तित्वात असतात, तर काही केवळ कल्पना असतात. अमेरिकी हेरगिरी संस्था सध्या अशाच एका प्रकल्पावर काम करत आहेत. स्मार्ट ई-पँट्स (स्मार्ट इलेक्ट्रिकली पॉवर्ड अँड नेटवर्क्ड टेक्स्टाइल सिस्टिम्स) असे त्याचे नाव असून त्यावरील संशोधनासाठी अमेरिकी सरकारने २२ दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे.

हेरगिरीच्या जगतात दोन प्रकार पडतात. एक - ह्युमन इंटेलिजन्स (ह्युमिंट) आणि दुसरा टेक्निकल इंटेलिजन्स (टेकिंट). अर्थात, गुप्तहेरांकडून जमवलेली माहिती आणि तांत्रिक उपकरणे वापरून गोळा केलेली माहिती. मानवी हेरगिरीच्या सुरस कथा शीतयुद्धाच्या काळात बऱ्याच गाजल्या होत्या. त्यावर आधारित अनेक चित्रपटही प्रसिद्ध आहेत. आता वैज्ञानिक प्रगतीबरोबरच शत्रूविषयी गुप्त माहिती मिळवण्याचे तंत्रही बदलत आहे. कृत्रिम उपग्रह आणि इंटरनेटने त्याच्या कक्षा विस्तारित केल्या आहेत. त्याचप्रमाणे जसजसा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा आणि सिलिकॉन चिप्सचा आकार लहान लहान होत चालला आहे, तशी हेरगिरीची नवीन साधनेही विकसित होत आहेत. त्याच तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात केला जात आहे.

सध्या स्मार्ट वॉच (मनगटी घड्याळे) आणि फिटनेस ट्रॅकर्सचा वापर सर्रास होताना दिसतो. ही माहितीची देवाण-घेवाण करणारी वेअरेबल, म्हणजेच अंगावर परिधान करता येणारी उपकरणे आहेत. याच तत्त्वाचा वापर करून स्मार्ट ई-पँट्स विकसित केल्या जात आहेत. त्यात शर्ट, पँट्स, अंडरवेअर, मोजे आदी कपडे तयार केले जातील. मात्र, ते नेहमीच्या कपड्यांपेक्षा वेगळे असतील. त्यासाठी वेगळ्या धाग्यांचा वापर केला आहे. यूएस आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ सोल्जर नॅनोटेक्नॉलॉजीज आणि एमआयटी यांनी संयुक्त विद्यमाने हे धागे विकसित केले आहेत. त्यात अत्यंत सूक्ष्म आकाराच्या (नॅनो) सिलिकॉन मायक्रोचिप्स बसवल्या आहेत. हे धागे माहितीचे संकलन, विश्लेषण आणि देवाण-घेवाण करू शकतात.

अशा धाग्यांचा वापर करून इंटेलिजन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स अॅक्टिव्हिटी (इर्पा) या संस्थेने स्मार्ट ई-पँट्सची निर्मिती चालवली आहे. इर्पा ही संस्था अमेरिकेच्या हेरसंस्थांसाठी विविध उपकरणे तयार करण्याचे काम करते. अमेरिकी सेनादलांसाठी शस्त्रास्त्रे विकसित करणाऱ्या दर्पा नावाच्या संस्थेप्रमाणेच तिचे कार्य आहे. स्मार्ट ई-पँट्स प्रकल्पांतर्गत विकसित केलेले कपडे प्रामुख्याने अमेरिकेचे गुप्तहेर वापरतील. हे कपडे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग, जिओलोकेशन डेटा गोळा करणे आदी कामे करू शकतील. हे कपडे पाण्याने धुताही येतात. या प्रकल्पासाठी इर्पाने पाच संस्था आणि कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत. त्यात नॉटिलस डिफेन्स, लिडोज, एमआयटी, एसआरआय इंटरनॅशनल आणि अरिते यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in