रावळपिंडीच्या आयुक्तांचा राजीनामा; पाकच्या निवडणुकीत गैरव्यवहाराची कबुली

त्या पार्श्वभूमीवर रावळपिंडीच्या विभागीय आयुक्तांनी गैरव्यवहाराची जाहीर कबुली दिल्याने खळबळ माजली आहे.
रावळपिंडीच्या आयुक्तांचा राजीनामा; पाकच्या निवडणुकीत गैरव्यवहाराची कबुली

रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याची कबुली देत रावळपिंडीचे विभागीय आयुक्त लियाकत अली चत्ता यांनी शनिवारी राजीनामा दिला. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आणि देशवासीयांची माफी मागितली. माझ्या देखरेखीखाली रावळपिंडी विभागात निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचे मी मान्य करतो.

आम्ही ५० हजार मतांचा फरक असलेल्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी मतपत्रिकांवर खोटे शिक्के मारले. काही ठिकाणी मतपत्रिकांवर खोटे शिक्के मारण्याचे काम आजही सुरू आहे. आम्ही देशवासीयांचा अपराध केला आहे. मी देशाची आणि निवडणूक अधिकाऱ्यांची माफी मागतो. रावळपिंडीच्या कचेरी चौकात आम्हाला जाहीरपणे फाशी दिली पाहिजे, असे लियाकत अली चत्ता यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तेथेच त्यांनी राजीनामा सादर केला. शनिवारी सकाळी पश्चात्तापामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही चत्ता यांनी सांगितले.

पाकिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री अमीर मीर यांनी चत्ता यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. निवडणूक प्रक्रियेला अवैध ठरवण्यासाठी चत्ता भलतेसलते आरोप करत आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे गुन्ह्याची अधिकृत कबुली ठरत नाही. आत्महत्येबद्दल जाहीरपणे बोलणारा माणूस वेडसरच असू शकतो. चत्ता १३ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांना राजकारणात प्रवेश करायचा असेल. त्यामुळेच ते हे नाटक करत आहेत, असे मीर म्हणाले.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. निवडणुकीत सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा मिळवल्या. त्या खालोखाल जागा नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) मिळवल्या. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला १३३ जागांचा आकडा कोणताही पक्ष गाठू शकला नाही. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर रावळपिंडीच्या विभागीय आयुक्तांनी गैरव्यवहाराची जाहीर कबुली दिल्याने खळबळ माजली आहे.

इम्रान खान यांचा पक्ष विरोधी भूमिकेत

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने नॅशनल असेंब्लीत (संसद) विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दाखवली आहे. नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षांनी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली चालवल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in