रुवेन अझर इस्रायलचे भारतातील नवीन राजदूत - इस्रायलच्या सरकारची माहिती  

इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून अनुभवी मुत्सद्दी रुवेन अझर यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
रुवेन अझर इस्रायलचे भारतातील नवीन राजदूत
- इस्रायलच्या सरकारची माहिती  
PM

जेरुसलेम : इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून अनुभवी मुत्सद्दी रुवेन अझर यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. ५६ वर्षीय अझर हे श्रीलंका आणि भूतानमध्ये अनिवासी राजदूत म्हणूनही काम करतील, असे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. अझर सध्या रुमानियामध्ये इस्रायलचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. ते नवी दिल्लीत कधी पदभार स्वीकारतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अझर हे २०२१ पासून भारतात इस्रायलचे राजदूत म्हणून कार्यरत असलेले नाओर गिलॉन यांची जागा घेतील.

इस्रायलच्या सरकारने सोमवारी २१ देशांतील राजदूतांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. त्यात रुवेन यांचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी नवीन नियुक्तींचे अभिनंदन करताना म्हटले की, ते इस्रायल आणि त्यांच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करतील.

अझर यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये १९६७ मध्ये झाला आणि त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी आपल्या कुटुंबासह इस्रायलला स्थलांतर केले. त्यांनी १९८५ ते १९८८ पर्यंत इस्रायली संरक्षण दलाच्या पॅराट्रूपर्स बटालियनमध्ये सेवा केली आणि २००८ पर्यंत ते राखीव सार्जंट होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधात हिब्रू विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे. १९९४ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाचा कॅडेट प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यापासून अझर यांनी मुख्यतः इराण प्रतिबंध संघाचे प्रमुख आणि मध्य पूर्व आर्थिक संशोधन संचालक यासारख्या मध्य पूर्व-संबंधित पदांवर काम केले. त्यांच्या जवळपास तीन दशकांच्या सेवेत त्यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाशी सहकार्य आणि पॅलेस्टिनी समस्यांवरील संशोधन केले आहे. अझर यांनी इस्रायलच्या दूतावासातील आर्थिक आणि व्यापार विभागाचे प्रमुख म्हणून कैरोमध्ये चार वर्षे काम केले. वॉशिंग्टनमध्ये २००३ ते २००६ या कालावधीत त्यांनी राजकीय घडामोडींसाठी सल्लागार म्हणून काम केले.

 अझर यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयात इस्रायल-अमेरिका-चीन टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्यानंतर लगेचच तीन वर्षे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत परराष्ट्र धोरणासाठी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणून काम केले आहे. अझर २०१४ ते २०१८ पर्यंत वॉशिंग्टन डीसी येथील इस्रायलच्या दूतावासात उपराजदूत होते. २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयात मध्यपूर्व संशोधन प्रमुख म्हणून आणि २०१० ते २०१२ या काळात अम्मानमधील इस्रायलच्या दूतावासात उपप्रमुख म्हणून काम केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in