

मॉस्को : रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचे ‘बुरेवेस्टनिक’ असे नाव आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः याची पुष्टी केली असून त्यांच्या म्हणण्यानुसार, हे क्षेपणास्त्र आज अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यातील कोणत्याही संरक्षण प्रणालीवर मात करू शकते.
रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या दबावाने रशिया विचलित झालेला नाही, हे पश्चिमी राष्ट्रांना दर्शविण्याच्या उद्देशाने रविवारी ही घोषणा करण्यात आली. या चाचणीबरोबर मोठ्या प्रमाणावर अणु-दलांचा सरावदेखील करण्यात आला. रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत असल्याचे चित्र आहे, अशातच ही चाचणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना लष्करी गणवेशात असलेल्या पुतिन यांनी घोषित केले की, ‘बुरेवेस्टनिक’ने प्रमुख चाचणीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हे एक अनोखे शस्त्र आहे, जे जगात इतर कोणाकडेही नाही. ते पुढे म्हणाले की, या क्षेपणास्त्राच्या महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि पुढील चरणांमध्ये या प्रणालीचे वर्गीकरण कसे करायचे आणि त्याच्या तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा कशा उभारायच्या हे निश्चित केले जाईल.
रशियाच्या सशस्त्र दलाचे ‘चीफ ऑफ द जनरल स्टाफ’ जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी पुतिन यांना माहिती दिली की, या क्षेपणास्त्राने सुमारे १५ तास उड्डाण केले आणि सुमारे १४,००० किलोमीटर (८,७०० मैल) अंतर पार केले. गेरासिमोव्ह यांच्या मते, या प्रणालीने क्षेपणास्त्रविरोधी आणि विमानविरोधी आपली उच्च क्षमता यशस्वीरित्या प्रदर्शित केली आहे, तसेच याची रचना कोणत्याही क्षेपणास्त्रविरोधी संरक्षणाला निष्क्रिय करण्याकरिता केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही लक्ष्यावर हल्ला शक्य
रशियाने हे स्पष्ट केले की, ‘बुरेवेस्टनिक’ अत्यंत कमी उंचीवर जमिनीपासून अंदाजे ५० ते १०० मीटर (१६४ ते ३२८ फूट) उड्डाण करू शकते, हे अंतर पारंपरिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच कमी आहे. इतक्या कमी उंचीवर उड्डाण केल्याने क्षेपणास्त्राला भूभागाचा वापर करून रडारपासून वाचता येते. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’नुसार (आयआयएसएस) या क्षेपणास्त्राचा सैद्धांतिक पल्ला २०,००० किलोमीटरपर्यंत (१२,४०० मैल) असू शकतो, ज्यामुळे हे क्षेपणास्त्र रशियन हद्दीतून पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्यावर हल्ला करू शकते.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
‘बुरेवेस्टनिक’ क्षेपणास्त्राचे अधिकृत नाव ‘९ एम ७३० बुरेवेस्टनिक’ आहे. हे पारंपरिक इंधनाऐवजी अणुऊर्जेवर चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. अनेक वर्षांपासून या क्षेपणास्त्राला विकसित केले जात आहे. याची घोषणा पुतिन यांनी मार्च २०१८ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिकरित्या केली होती. ‘नाटो’ याला ‘एसएससी-एक्स-९ स्कायफॉल’ म्हणून संबोधते. हे शस्त्र अणुउर्जेवर चालणारे आणि अण्वस्त्रांनी सुसज्ज आहे. त्यामुळे त्याला पारंपरिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळ्या क्षमता मिळतात.
शस्त्रागारात वाढ
पुतिन म्हणाले की, रशियन तज्ज्ञांनी एकदा सांगितले होते की, असे शस्त्र तयार करणे कदाचित कधीही शक्य होणार नाही, परंतु अनेक वर्षांच्या विकास आणि चाचणीनंतर त्यांचे दावे चुकीचे ठरले आहेत. या क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या शस्त्रागारात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.