कर्करोगावरील रामबाण लस तयार केल्याचा रशियाचा दावा; या शतकातील सर्वात मोठा शोध

कर्करोगासारख्या (कॅन्सर) गंभीर आजारावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे.कॅन्सरवर लस तयार केल्याचे रशियाने जाहीर केले आहे.
कर्करोगावरील रामबाण लस तयार केल्याचा रशियाचा दावा; या शतकातील सर्वात मोठा शोध
PM
Published on

मॉस्को : कर्करोगासारख्या (कॅन्सर) गंभीर आजारावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याचे रशियाने जाहीर केले आहे. रशियातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या नवीन संशोधनामुळे कॅन्सरपीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रशियाने ही लस ‘एमआरएनए’ तंत्रज्ञानाने विकसित केली असून हा या शतकातील सर्वात मोठा शोध असल्याचे मानण्यात येत आहे.

जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरणार आहे. लवकरच जगभरात हे औषध पोहोचविण्यात येणार आहे. या औषधांचे नाव काय अथवा त्याचा वापर कसा करणार याविषयीची माहिती अद्याप रशियाने दिली नाही. पण ही लस शरीरातील कॅन्सरचा प्रभाव निष्प्रभ करते आणि त्याचा फैलाव होऊ देत नाही, असा दावा करण्यात आला आहे.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, कॅन्सर विरोधात ही एक लस आहे. ही लस २०२५ च्या सुरुवातीलाच बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

‘रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटर’चे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली आहे. ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल, असा दावाही करण्यात आला आहे.

जगातील इतर देशांप्रमाणेच रशियातही कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. जवळपास ६,३५,००० हून अधिक रुग्णांची नोंद २०२२ या काळात झाली आहे. रशियात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकारसुद्धा कमी करणार आहे.

पुतिन यांनी या लसीबाबत अलीकडेच दिले होते संकेत

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध असून ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मदत करणारी असेल, असा दावा करण्यात आला आहे. ‘मॉस्को फोरम ऑन फ्युचर टेक्नॉलॉजी’च्या मंचावरून त्यांनी या लसीबद्दल घोषणा केली होती.

logo
marathi.freepressjournal.in