प्रिगोझिन यांच्या मृत्यूला रशियाचा दुजोरा

घातपात झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे
प्रिगोझिन यांच्या मृत्यूला रशियाचा दुजोरा

मॉस्को : वॅगनर गटाचे नेते आणि बंडखोर युवेजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या वृत्तास रशिया सरकारी सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे. यामुळे ते त्या अपघातग्रस्त विमानात होते की नाही, या शंकेचे निरसन झाले आहे. बुधवारी हे विमान कोसळले होते आणि त्यातील सातही व्यक्ती मृत घोषित करण्यात आल्या होत्या.

विमान अपघातस्थळी मिळालेल्या शवांच्या जुनकीय चाचण्या केल्यानंतर रशियाच्या शोधपथक समितीच्या प्रवक्ता स्वेत्लाना पेट्रोन्को यांनी प्रिगोझिन यांचा मृत्यू जाहीर केला आहे. तसेच रशियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने देखील त्या विमानातील सात प्रवाशी आणि तीन क्रू सदस्यांच्या यादीत प्रिगोझिन आणि त्याचे काही उच्च अधिकारी समाविष्ट असल्याचे जाहीर केले आहे. शोध समितीने मात्र हे विमान कशामुळे कोसळले याचा खुलासा केलेला नाही. हे विमान उड्डाण केल्यानंतर मॉस्को आणि पीटर्सबर्ग दरम्यान मघ्येच कोसळले होते. मात्र, या विमानाची कोसळण्याची वेळ पाहाता हा घातपात असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच ६२ वर्षांच्या प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्कराविरोधात एक दिवसाचे बंड पुकारुन आपले सैन्य घेउन त्यांनी युक्रेनकडून मॉस्कोच्या दिशेने कूच केली होती. तेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लॅडिमीर पुतीन यांनी हे बंड म्हणजे देशद्रोह असल्याचे जाहीर केले होते आणि संबंधितांना त्याची सजा मिळेल, असे विधान केले होते. प्रिगोझिन यांचा स्वभाव देखील परिस्थितीप्रमाणे रंग बदलण्याचा होता. यामुळे त्यांचा घातपात झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in