रशियात ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; रशिया, अमेरिका, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा; सुदैवाने जीवितहानी नाही

रशियाच्या कामचटका बेटांजवळ बुधवारी ८.८ रिक्टर स्केल तीव्रतेच्या प्रलयकारी भूकंपाचा धक्का बसला. पॅसिपिक समुद्रामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपानंतर अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
रशियात ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; रशिया, अमेरिका, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा; सुदैवाने जीवितहानी नाही
Photo : X (@Killercool63)
Published on

मॉस्को/टोकियो : रशियाच्या कामचटका बेटांजवळ बुधवारी ८.८ रिक्टर स्केल तीव्रतेच्या प्रलयकारी भूकंपाचा धक्का बसला. पॅसिपिक समुद्रामध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपानंतर अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. भूकंपानंतर रशिया आणि जपानच्या किनारी भागांमध्ये त्सुनामीच्या प्रचंड लाटांचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली.

भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी कामचटका बेटांजवळ शक्तिशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनीही याची पुष्टी केली असून भूकंपानंतर जपान, रशिया आणि अमेरिकेतील किनारी राज्यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमधील काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा पोहोचल्या असून भूकंपामुळे रशियाच्या पूर्वेकडील किनारी भागात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

जपानचा अणुऊर्जा प्रकल्प रिक्त

जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू होक्काइडोपासून २५० किलोमीटर दूर होता. पॅसिफिक समुद्रामध्ये १९.३ किलोमीटर आत भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांनी सांगितले. यामुळे नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. अनेक घरांना, इमारतींना तडे गेल्याचे वृत्त असून यामुळे काही भागांचा वीजपुरवठाही खंडित झाला असून, जपानचा फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पही रिकामा करण्यात आला आहे.

भूकंपानंतर इक्वेडोर आणि रशियाच्या काही किनारी भागांत ३ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. तसेच चिली, हवाई, जपान, सोलोमन बेट, अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्यूझीलंडमधील दक्षिणी भागांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये १ ते ३ मीटर उंचीच्या लाटा धडकण्याची शक्यता आहे.

भारताला धोका नाही

दरम्यान, या भूकंपाचा परिणाम आपल्या देशावरही होईल का, असा प्रश्न भारतीयांच्या मनातही निर्माण होऊ लागला असला तरी या भूकंपाचा भारत आणि हिंद महासागराला कोणताही धोका नसल्याचे ‘इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस’ने (आयएनसीओआयएस) स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत अलर्ट

रशियातील भूकंपानंतर अमेरिकेच्या अनेक किनारी भागात, विशेषतः पश्चिम किनारपट्टी, हवाई आणि कॅलिफोर्नियामध्ये त्सुनामीचा धोका दिसून आला. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनाही याबद्दल सतर्क करण्यात आले. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक सूचना जारी केली, ज्यामध्ये तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अमेरिकन प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले. जर त्सुनामीचा इशारा दिला गेला तर उंच भागात जा. दूतावासाने प्लस १-४१५-४८३-६६२९ हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे, जेणेकरून गरज पडल्यास भारतीय नागरिक मदत घेऊ शकतील.

हवाई बेटे आणि जपानमध्ये परिणाम

हवाई बेटे आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी झाली. लोक उंच भागात पळू लागले. तेथील सरकारने सर्व शाळांचे संध्याकाळचे वेळापत्रकही रद्द केले आहे. तर जपानच्या उत्तरेकडील भागातील इशिनोमाकी बंदराला सुमारे ५० सेमी उंचीची त्सुनामी लाट धडकली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी लाट होती. दरम्यान, जपानमधील १६ ठिकाणी त्सुनामीच्या लाटा उसळल्याचे समोर आले आहे, पण आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

रशियामध्ये नुकसान, जीवितहानी नाही

रशियाच्या काही भागात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अनेक लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. आतापर्यंत कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. रशियामध्ये झालेल्या या भूकंपानंतर काही काळाने कुरिल बेटांवर आणखी एक भूकंप जाणवला. त्याची तीव्रता ६.३ होती. हा भूकंप वरवरचा होता, म्हणजेच जमिनीपासून खूप उथळ खोलीवर होता, ज्यामुळे त्याचा परिणामही तीव्रतेने जाणवला. या भूकंपानंतर, फिलीपिन्सच्या एजन्सींनी असा इशाराही दिला आहे की, एक मीटरपेक्षा कमी उंचीच्या त्सुनामी लाटा तेथील किनारपट्टीच्या भागात धडकू शकतात. लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्यास आणि पुढील काही तासांसाठी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

‘टास्क फोर्स’ची स्थापना

त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर वेगवेगळ्या देशातील सरकारांनी पावले उचलण्यास सुरुवात केली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे. जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, होक्काइडोच्या पूर्वेकडील किनारी भागात आणि रशियाच्या कुरिल बेटांवर त्सुनामीच्या पहिल्या लाटा धडकल्या आहेत. या लाटांची तीव्रता कमी असल्याने कोणताही धोका नाही. या भागातील रहिवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते.

logo
marathi.freepressjournal.in