रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; ३ ठार, अनेक जखमी

रशियाने शनिवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत युक्रेनमधील अनेक भागांवर हल्ला केला. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; ३ ठार, अनेक जखमी
Photo : X (@m_kniazhytskyi)
Published on

कीव्ह : रशियाने शनिवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत युक्रेनमधील अनेक भागांवर हल्ला केला. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

निप्रोपेट्रोव्हस्क, मायकोलेव्ह, चेर्नीहीव्ह, झापोरिझाझिया, पोल्ताव्हा, कीव्ह, ओदेसा, सुमी आणि खारकीव्ह या नऊ प्रांतांवर हल्ले करण्यात आल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले. रशियाने आमच्या पायाभूत सुविधा, निवासी परिसर आणि नागरी वस्त्यांना मुख्यत्वे लक्ष्य केले. निप्रो शहरात एक क्षेपणास्त्र बहुमजली इमारतीवर डागण्यात आले. आमच्या पायाभूत सुविधांचा नाश करण्यासाठीच हे हल्ले करण्यात आले, असेही ते म्हणाले.

रशियाने ६१९ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे. युक्रेनच्या दलांनी ५५२ ड्रोन्स, दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ क्रूझक्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा युक्रेनच्या दलांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीच्या वेळी पुढील आठवड्यात आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहोत, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in