रशिया-युक्रेन युद्धाला २ वर्षे पूर्ण : युक्रेनला US कडून तातडीच्या मदतीची प्रतीक्षा, गमावलेला प्रदेश परत मिळवताना होतेय दमछाक

रशिया-युक्रेन युद्धाला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत असताना युक्रेन अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून आणखी मदतीची प्रतीक्षा करत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला २ वर्षे पूर्ण : युक्रेनला US कडून तातडीच्या मदतीची प्रतीक्षा, गमावलेला प्रदेश परत मिळवताना होतेय दमछाक

कीव्ह : रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर आक्रमण केले, त्याला आज, शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. लष्करी ताकदीत बराच वरचढ असलेला रशिया युक्रेनवर काही दिवसांतच मात करेल, असे जगभरातील तज्ज्ञांना सुरुवातीला वाटत होते. मात्र, युक्रेनने ती अटकळ फोल ठरवत दोन वर्षे झुंज दिली. अमेरिका आणि युरोपीय देशांनी केलेली निधी आणि शस्त्रास्त्रांची मदत हे त्यामागचे मोठे कारण होते. गतवर्षी अमेरिका आणि युरोपीय देशांना युक्रेनला ४२. ५ अब्ज डॉलर्सची मदत केली होती. त्यात अत्याधुनिक तोफखाना, दारुगोळा, क्षेपणास्त्रे, ड्रोन आदींचा समावेश आहे. या संघर्षाला दोन वर्षे पूर्ण होत असताना युक्रेन अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून आणखी मदतीची प्रतीक्षा करत आहे. या देशांनी दिलेला शब्द पाळण्यात केलेल्या दिरंगाईमुळे युद्धात गमावलेला प्रदेश परत मिळवताना युक्रेनच्या सैन्याची दमछाक होत आहे.

या मदतीच्या जोरावर युक्रेनने काही महिन्यांपूर्वी रशियाने व्यापलेल्या प्रदेशात प्रतिचढाई सुरू केली. पण त्या प्रयत्नांना अद्याप फारसे यश मिळालेले नाही. युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील बरेचसे प्रदेश अद्याप रशियाच्याच नियंत्रणाखाली आहेत. गेल्या काही दिवसांत युक्रेन आणि रशियाच्या फौजांमध्ये अवदीईव्का या शहराच्या परिसरात जोरदार लढाई झाली. पण त्यात युक्रेनचा पराभव झाला. अमेरिका आणि युरोपीय देशांनी देऊ केलेली सर्व मदत अद्याप युक्रेनमध्ये पोहोचलेली नाही. त्याला दिरंगाई होत असल्याने युक्रेनी सैन्याचा लढण्याच्या क्षमतांवर मर्यादा येत आहेत. दोन वर्षांच्या सततच्या लढाईने युक्रेनी सैन्याची दमछाक झाली आहे. जर्मनीने त्यांचे आघाडीचे 'लेपर्ड १ ए-५' प्रकारचे रणगाडे युक्रेनला देऊ केले, तर अमेरिकेने एफ-१६ लढाऊ विमाने देण्याची तयारी दाखवली. पण ही मदत प्रत्यक्ष रणभूमीवर पोहोचणे आणि त्याचा प्रभावी वापर करण्यास युक्रेनचे सैन्य तयार होणे याला अद्याप वेळ लागणार आहे.

अमेरिकी पॅकेजकडे लक्ष

युक्रेन, इस्रायल आणि तैवानला मिळून ९५ अब्ज डॉलर्सची मदत देण्याच्या प्रस्तावाला अमेरिकेच्या सिनेटने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली. यातील ६० अब्ज डॉलर्सच्या आसपास मदत युक्रेनला मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज‌्) अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की या मदतीकडे आस लावून बसले आहेत. या मदतीअभावी रशियाविरुद्ध लढ्यात युक्रेनचे सैन्य लंगडे पडत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in