अल्पकालीन युद्धबंदीपूर्वी रशियाच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू; झेलेन्स्कींचा रशियावर निशाणा

युक्रेनच्या ऊर्जा ग्रीडवर रात्री रशियाने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार तर ३९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अल्पकालीन युद्धबंदीपूर्वी रशियाच्या हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू; झेलेन्स्कींचा रशियावर निशाणा
Published on

कीव : युक्रेनच्या ऊर्जा ग्रीडवर रात्री रशियाने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार तर ३९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. नाझी जर्मनीवरील विजयाच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त रशियाने दोन दिवसांच्या एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले झाल्याने युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी मॉस्कोच्या या ‘अत्यंत निष्ठुर’ भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

झेलेन्स्कींचा आक्षेप

रशिया कोणत्याही क्षणी गोळीबार थांबवू शकतो, ज्यामुळे युद्ध आणि आमचे प्रत्युत्तर थांबेल, असे झेलेन्स्की यांनी एक्सवर म्हटले आहे. शांततेची गरज असून ती साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष पावलांची आवश्यकता आहे. युक्रेनही त्यानुसारच पावले उचलेल. याआधी ऑर्थोडॉक्स इस्टरच्या वेळीही रशियाने अशाच अल्पकालीन एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, मॉस्को आणि कीवमधील अविश्वासामुळे त्याचे कोणतेही ठोस परिणाम दिसून आले नव्हते.

युक्रेनच्या हवाई दलाच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ते मंगळवारपर्यंत रशियाने ११ इस्कंदर-एम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि १६४ स्ट्राइक ड्रोन डागले. क्रेनच्या हवाई संरक्षण पथकांनी १४९ ड्रोन आणि एक क्षेपणास्त्र पाडले. दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या या युद्धात रशियाने युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ले केले आहेत. पोल्टावा आणि खार्किव प्रदेशातील नैसर्गिक वायू उत्पादन केंद्रांवर रशियाने हल्ले केले आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून नाफ्टोगॅझच्या प्रकल्पांवर १०७ वेळा हल्ले झाले आहेत. झेलेन्स्की यांनी पोल्टावावरील हल्ल्याला ‘अतिशय निंदनीय’ म्हटले आहे, कारण बचावकार्य सुरू असतानाच रशियाने तिथे दुसरे क्षेपणास्त्र डागले. युक्रेनच्या उपपंतप्रधान युलिया स्वारिडेन्को म्हणाल्या की, रशियाचे मुख्य लक्ष्य ऊर्जा प्रकल्प, तेल आणि वायू पायाभूत सुविधा, रेल्वे आणि औद्योगिक स्थळे आहेत, पण या हल्ल्यात घरे आणि व्यावसायिक इमारतींचेही नुकसान झाले आहे.

इशारा आणि प्रत्युत्तर

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी आणि शनिवारी युक्रेनमध्ये एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली आहे. मात्र, ९ मे रोजी साजरी होणाऱ्या ‘व्हिक्ट्री डे’च्या (विजय दिवस) उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास युक्रेनवर पुन्हा हल्ले केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, युक्रेन बुधवारपासून मध्यरात्री १२ वाजल्यापासून युद्धाबंदी पाळेल आणि त्या क्षणापासून रशियाच्या कृतीला जशास तसे उत्तर दिले जाईल. मात्र, त्यांनी या युद्धाबंदीची कोणतीही अंतिम तारीख दिलेली नाही.

युक्रेनकडून प्रत्युत्तर

दुसरीकडे, युक्रेननेही रशियन हद्दीत दीर्घ पल्ल्याच्या हल्ल्यांची गती कायम ठेवली आहे. १८ रशियन प्रदेशांमध्ये युक्रेनचे २८९ ड्रोन रात्रभरात नष्ट केल्याचे सांगितले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या चेबोक्सरी शहरात तीन जण जखमी झाले आहेत.

तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ला

युक्रेनच्या ड्रोनने सेंट पीटर्सबर्गजवळील किरिषी तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ला केला, ज्यामुळे आग लागली. स्थानिक गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोजडेन्को यांच्या मते २९ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in