
मॉस्को : रशियाच्या आण्विक विभागाचे प्रमुख इगोर किरिलोव यांचा मंगळवारी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. जनरल किरिलोव हे अपार्टमेंटमधून बाहेर पडत असतानाच त्यांच्या जवळ असलेल्या स्कूटरमध्ये स्फोट झाला. त्यांचा सहाय्यकही या स्फोटात मारला गेला. आण्विक प्रमुखाचा मृत्यू झाल्याने रशिया हादरला आहे.
मॉस्को येथील क्रेमलिनपासून केवळ ७ किमी अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटात ३०० ग्रॅम टीएनटीचा वापर झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने किरिलोव यांची हत्या युक्रेननेच केली असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सीशी संबंधित सूत्राने याची जबाबदारी घेतली.
एप्रिल २०१७ मध्ये किरिलोव हे आण्विक विभागाचे प्रमुख बनले. तत्पूर्वी, त्यांनी रशियाच्या किरणोत्सर्ग, रासायनिक व जैविक शस्त्रास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते. हा स्फोट इतका मोठा होता की, चार मजली इमारतीच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या.
हत्येचा बदला घेऊ!
किरिलोव यांच्या मृत्यूनंतर रशियन संसदेच्या उपाध्यक्षांनी सांगितले की, त्यांच्या हत्येचा बदला जरूर घेतला जाईल. यामागे ज्यांचे कटकारस्थान असेल त्याचा पर्दाफाश करून कठोर कारवाई केली जाईल.