अन्न-धान्य पुरवठा करारातून रशियाची माघार- जागतिक अन्नसुरक्षेसाठी धोका

जगातील किमान ४५ गरीब देशांना अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा होणार नाही
अन्न-धान्य पुरवठा करारातून रशियाची माघार- जागतिक अन्नसुरक्षेसाठी धोका

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्न-धान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या करारातून रशियाने तात्पुरती माघार घेतली आहे. त्याने जागतिक अन्न-धान्य पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, मका, सूर्यफूल तेल, खते, रसायने आणि खनिज तेल व नैसर्गिक वायूचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत. युद्धामुळे या सर्व गोष्टींच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि तुर्कस्तान यांच्या पुढाकाराने रशिया आणि युक्रेन यांच्यात समझोता घडवून एक करार करण्यात आला होता. त्यानुसार काळ्या समुद्रातून जहाजांद्वारे युक्रेनमधील गहू आणि अन्य उत्पादने जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास रशियाने संमती दिली होती. त्या बदल्यात रशियालाही अन्नधान्य आणि खते निर्यातील परवानगी देण्यात आली होती. ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह नावाने हा करार गाजला होता.

मात्र, आता अमेरिका आणि युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधामुळे आपल्या निर्यातीवर परिणाम होत असल्याची तक्रार रशियाने केली आहे. त्याचा बदला म्हणून रशियाने युक्रेनमधून होणाऱ्या निर्यातीवरही बंधने आणली आहेत. तसेच या कराराला मुदतवाढ देण्यास रशियाने नकार दिला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सोमवारी त्यासंबंधी घोषणा केली.

त्यामुळे जगातील किमान ४५ गरीब देशांना अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इजिप्त, लेबनन, नायजेरिया, सोमालिया, केनिया, मोरोक्को, ट्युनिशिया आदी देशांना त्याचा बराच फटका बसू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in